पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिकप्रकरणी (Raghunath Kuchik) भाजपा नेत्या चित्रा वाघ उद्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाणार आहेत. कुचिक प्रकरणात चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करण्याची मागणी वाघ यांनी केली होती. याचप्रकरणी त्या उद्या सकाळी 11 वाजता जबाब नोंदविणार आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी रघुनाथ कुचिक यांचा बलात्कारी तसेच एकेरी उल्लेख केला आहे. त्या म्हणाल्यात, ‘रघुनाथ कुचिक जामिनावर बाहेर असून जामिनाच्या (Bail) अटीशर्तींचा त्याने भंग केल्याने चौकशी होत आहे. रघुनाथ कुचिकचा जामीन रद्द व्हावा, ही मागणी’. लैंगिक शोषणप्रकरणी एका तरुणीने रघुनाथ कुचिक यांची तक्रार केली होती, त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. तर सध्या कुचिक जामिनावर आहेत. मात्र त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात एका तरुणीने रघुनाथ कुचिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. लग्नाचे आमिष दाखवत या 24 वर्षीय तरुणीसोबत शारीरिक संबंध करून तिला गर्भवती केले. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुचिक यांच्याविरोधात पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाला नंतर वेगळे वळण लागले.
याप्रकरणी पीडित तरुणीने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली होती. नंतर मात्र पीडितेने चित्रा वाघ यांच्यावरच आरोप केले होते. त्या फेसकॉलवर माझ्याशी बोलायच्या आणि मला मेसेज पाठवायला लावायच्या, असा आरोप पीडित तरुणीने केला होता. त्यांनी जे मेसेज वाचून दाखवले ते त्यांनीच मला पाठवायला सांगितले होते. त्यांच्या सांगण्यानुसारच मी त्यांना मेसेज पाठवत होते, असा आरोप या तरुणीने केला होता. चित्रा वाघ यांना माझे काहीही पडलेले नाही. त्यांचा जो काही रोख आहे तो रघुनाथ कुचिक यांच्यावर आहे, असेही पीडित तरुणी म्हणाली होती.
मी १५एप्रिल रोजी @CPPuneCity ना अर्ज करत शिवसेना नेता बलात्कारी रघुनाथ कुचिक जामिनावर बाहेर असून जामिनाच्या अटीशर्तींचा त्याने भंग केल्याने चौकशी होतं रघुनाथ कुचिकचा जामिन रद्द व्हावा ही मागणी केलेली
यासंदर्भात उद्या सकाळी ११ वा.मी स्टेटमेंट नोंदवायला शिवाजीनगर पो.स्टे ला येतीये pic.twitter.com/07ZP3o6LFR— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 1, 2022
रघुनाथ कुचिक लैंगिक अत्याचार प्रकरणी माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे असल्याचे भाजपा नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांना यासंबंधी पत्रही लिहिले होते. त्यात आपल्यावरील सर्व आरोप खोडून काढले होते. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली होती. संबंधित पीडितेला मी सर्वतोपरी मदतच केली. ती एकटी पडली आहे, असे मला वाटले, म्हणून तिला सहाय्य केले. मात्र माझ्यावरच आरोप करण्यात आले. मात्र हे सर्व आरोप धादांत खोटे आहेत. त्यामुळे या सर्व आरोपांची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली होती.