पुणे : पुण्यात (Pune) भाजपच्या (BJP) गोटात अतिशय वेगाने घडामोडी घडत आहे. महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मातब्बर उमेदवार उभे केल्यामुळे आता मविआ विरोधातील भाजपची चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि मुक्ता टिळक (Mukta Tilak) कार्यरत होते. पण त्यांचं निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक जाहीर झालीय. या पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे एक नंबरचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: या निवडणुकीचे सूत्रे आपल्या हाती घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे संबंधित बातमी समोर आल्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. भाजपने पुण्यातील दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लावलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीची सूत्र आता आपल्या हाती घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आता प्रचार यंत्रणा राबवली जाणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या आदेशानुसार प्रचार यंत्रणा काम करेल, असं स्पष्ट झालंय.
याबाबत शेवटच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यापर्यंत निरोप देण्यात आलाय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची बैठक होईल. त्यानुसार नियोजन करण्याचे आदेश स्थानिक कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे भाजप पक्षाने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिली आहे. फडणवीसांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेताच निवडणूक प्रभारी म्हणून मोहोळ यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर आमदार माधुरी मिसाळ निवडणूक प्रमुख आणि धीरज घाटे निवडणूक सह प्रमुख असणार आहेत.
या निवडणुकीत धीरज घाटेही उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र भाजपनं त्यांना निवडणूक कार्यक्रमाची जबाबदारी दिली.
चिंचवडमध्ये शंकर जगताप यांच्यावर जबाबदारी देण्यात आलीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जबाबदारीचं वाटप केल्याची माहिती समोर आलीय.
दरम्यान, चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्यादिवशी 26 जणांनी अर्ज दाखल केले.
या अर्जांची 8 फेब्रुवारीला छाननी होणार आहे. तर, 10 फेब्रुवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारी पासून अर्ज वाटप सुरु झाले. त्यानंतर आज अखेरपर्यंत 128 जणांनी 231 अर्ज नेले. त्यापैकी 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले आहेत.
यामध्ये किती जणांचे अर्ज छाननीत बाद होतात. किती उमेदवार मागे घेतात आणि प्रत्यक्षात निवडणुकीत किती उमेदवार राहतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भाजपकडून अश्विनी जगताप, भाजपचे पर्यायी उमेदवार म्हणून शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून राहुल कलाटे यांनी अर्ज दाखल केला आहे. पण, त्यांनी एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे त्यांचा अपक्ष अर्ज राहील.