उपमुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरे यांना दोस्तीची खुली ऑफर, भाजपच्या मनात नेमकं काय?

| Updated on: Jun 14, 2023 | 9:43 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडेल, याचा काहीच अंदाज नाही. कारण सध्याच्या घडीला ज्या घडामोडी घडत आहेत त्या कल्पनेच्या पलिकडे घडताना दिसत आहेत. सत्ताधारी शिवसेना आणि भाजप पक्षात गेल्या दोन दिवसात तणाव आलेला बघायला मिळाला. आता भाजपच्या बड्या नेत्याने उद्धव ठाकरे यांना उद्देशून मोठं वक्तव्य केलं आहे.

उपमुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरे यांना दोस्तीची खुली ऑफर, भाजपच्या मनात नेमकं काय?
Uddhav Thackeray
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात दहा महिन्यांपूर्वी मोठा भूकंप आला. या भूकंपामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन राज्यात सत्तापरिवर्तन घडवून आणलं. पण गेल्या दोन दिवसांपासूनच्या घडामोडी वेगळ्या घडताना दिसत आहेत. त्याला कारण म्हणजे शिवसेनेची वादग्रस्त ठरलेली जाहिरात. खरंतर त्याआधी कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात संताप व्यक्त केला. त्यानंतर काल वृत्तपत्रात छापून आलेल्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता अधिक असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे युतीत पुन्हा वाद उफाळून आला. त्यानंतर आता भाजपच्या बड्या नेत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट ऑफर दिली आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर दिली आहे. ते मोदी@9 महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. या दरम्यान त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. “उद्धव ठाकरे यांना जर भाजपसोबत यायचं असेल तर त्यासाठी त्यांना भाजपची दारं कायम खुली आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करावी. आम्ही उद्धव ठाकरेंकडे जाणार नाहीत”, असं मोठं वक्तव्य केशवप्रसाद मौर्य यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात गेले. त्यांनी खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली”, अशी टीका केशवप्रसाद मौर्य यांनी केली.

हे सुद्धा वाचा

भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर?

शिवसेना आणि भाजप ही पारंपरिक युती आहे, असं दोन्ही पक्षांकडून सांगितलं जातं. पण 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटल्याचं बघायला मिळालं होतं. पहिल्यावेळी युती तुटल्यानंतर पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र आले होते. दोन्ही पक्षाचे नेते राज्यात मंत्री होते. तर 2019 च्या निवडणुकीनंतर हे दोन्ही मित्र पक्ष टोकाचे शत्रू बनले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. पण अडीच वर्षात हे सरकार कोसळलं.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनीच हे सरकार पाडत पक्षाचं थेट विभाजन करुन टाकलं. या कामात एकनाथ शिंदे यांना भाजपने साथ दिली. पण आता शिंदे गट आणि भाजपातही वाद होताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि ठाकरे एकत्र आले तर आणखी वेगळ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. विशेष म्हणजे त्यावेळी खरी शिवसेना कुणाची?, शिंदे गट कुठे जाणार? असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. तसेच उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी आज केलेलं विधान हे शिंदे गटावर दबाव आणण्यासाठी तर नाही ना? अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.

केशवप्रसाद मौर्य यांची शरद पवारांवर टीका

दरम्यान, मौर्य यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. “ज्यांचे 4 खासदार आहेत ते पंतप्रधान पदाची स्वप्न पाहात आहेत. जे 50 खासदार निवडून आणू शकत नाहीत ते मोदींना रोखण्याससाठी एकत्र येत आहेत”, अशी टीका मौर्य यांनी केली. तसेच आगमी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास केशवप्रसाद मौर्य यांनी व्यक्त केला.