पुण्यात चाललंय तरी काय? गिरीश बापट यांना जाऊन तीनच दिवस झाले… अन् पुण्यात ‘या’ नेत्याचे बॅनर्स झळकले; भावी खासदार…

| Updated on: Apr 01, 2023 | 7:11 AM

खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन तीन दिवस उलटले आहेत. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर भाजप कुणाला उमेदवारी देणार अशी चर्चा सुरू असतानाच जगदीश मुळीक यांचे भावी खासदार उल्लेख असलेले बॅनर्स झळकले आहेत.

पुण्यात चाललंय तरी काय? गिरीश बापट यांना जाऊन तीनच दिवस झाले... अन् पुण्यात या नेत्याचे बॅनर्स झळकले; भावी खासदार...
girish bapat
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं तीन दिवसांपूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी गिरीश बापट यांची प्राणज्योत मालवली. बापट गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. गिरीश बापट हे पुण्याचे खासदार होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, बापट यांना जाऊन तीन दिवस उलटले नाही तोच या जागेवर इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या एका नेत्याची तर पुण्यात बॅनरबाजी सुरू झाली आहे. त्यावर या नेत्याचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

जगदीश मुळीक हे भाजपचे पुणे शहर अध्यक्ष आहेत. माजी आमदार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुळीक यांच्या नावाचे मोठमोठे बॅनर्स लावले आहेत. त्यावर भावी खासदार जगदीश मुळीक असं लिहिलं आहे. भावी खासदार जगदीश मुळीक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं या बॅनर्सवर लिहिलं आहे. आज 1 एप्रिल रोजी मुळीक यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स पुणे शहरात लावली आहेत. मोक्याच्या ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आल्याने सर्वांचे लक्ष वेधत आहेत.

मात्र, या बॅनर्सवर आता टीकाही होऊ लागली आहे. गिरीश बापट यांच्या निधनाला अवघे तीन दिवसही झाले नाहीत अन् त्यांच्या जागेवर दावा करणारे मुळीक यांचे बॅनर्स झळकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुळीक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सबुरीन नाहीये का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. दरम्यान, या बॅनर्सवर टीका होऊ लागल्याने कल्याणी नगर परिसरातील बॅनर्स काढून टाकण्यात आले आहेत.

 

राष्ट्रवादीने लाजच काढली

दरम्यान, हे बॅनर्स झकळल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी भाजपची लाजच काढली आहे. चव्हाण यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू दयाची होती. त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत भावी खासदाचे बॅनर पण लावले. जनाची नाही मनाची तरी ठेवा, अशा शब्दात चव्हाण यांनी टीका केली आहे.

jagdish mulik

काँग्रेस पुणे लढवणार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. बापट यांना जाऊन तीन दिवस झाले. राज्याच्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एवढी घाई काय आहे? जरा शांत राहा. निवडणुका होतच राहतील की. बापट जाऊन आज तीन दिवस होतायत, माणुसकी हा प्रकार आहे का नाही? असा सवाल अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केला होता.