पुणे : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही. बेबंदशाही चालली आहे. जे सत्तेत आहेत तेच धिंगाणा घालत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यात सुरू असलेल्या वादावर त्यांनी आपले मत व्यक्त करत राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड उगवण्याचे काम करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था (Law & Order) नाही. खून होतायेत, दरोडे पडतायेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले जात नाहीत. अशा काळात राष्ट्रपती राजवट (President Rule) येणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. एका व्यक्तीला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा कायदा असा प्रकार सध्या राज्यात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला मागे नेल्याचा घणाघात नारायण राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केला.
खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर जो प्रकार केला आणि त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली, त्यावर नारायण राणे म्हणाले, की या देशात लोकशाही आहे. कोणी हनुमाना चालिसा पठण करण्यासाठी येत असेल तर विरोध का. एका व्यक्तीला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा कायदा लावला जात आहे. मुख्यमंत्र्यांचा कोणावरही अंकुश नाही. ना संजय राऊतांवर ना इतर कोणावर. संजय राऊतांचे नाव नको. माझा दिवस खराब जाईल, अशी टीका राणेंनी केली.
उद्धव ठाकरे कधी सक्षम मुख्यमंत्री होते? राज्याचा मुख्यमंत्री सक्षम नाही. राज्याचे प्रश्न त्यांना माहीत नाहीत. 89 हजार कोटींची तूट आहे. या राज्याची व्यवस्था पूर्ण बिघडली आहे. महाराष्ट्राला 10 वर्ष या मुख्यमंत्र्यांनी मागे नेले आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावार भाषण केले, कलानगरच्या नाक्यावर केले तसे, अशी बोचरी टीका राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.