पुणे : गेली एक महिना राज्यात विजेची टंचाई (Electricity shortage) आहे. या टंचाईला राज्य सरकार जबाबदार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना, अन्य क्षेत्रांना वीज पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र एक महिना सरकार सांगत आहे, कोळसा मिळाला नाही. रेल्वेचा रँक मिळाला नाही. असे म्हणून स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली आहे. कोळशाची टंचाई केवळ नियोजनाअभावी सहन करावी लागत आहे. यासंबंधी आम्ही जानेवारीत पत्र लिहून सांगितले होते, की कोळशाचे (Coal) नियोजन करा, 15 दिवसाचे नियोजन हवे. मात्र हे तीन पक्षाचे सरकार आहे. कधी ते एकत्र बसत नाहीत. वेळ आली, की केंद्र सरकारवर खापर फोडतात. त्यांना केंद्र सरकारविरोधात बोंबलण्याचे कामच सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे.
3 हजार कोटी रुपये हे कोळशाचे राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येणे बाकी आहे. तरीही आम्ही कोळसा थांबवलेला नाही. उन्हाळ्यात कोळसा जास्त लागतो. राज्य सरकारने कोळशाचा साठा करून ठेवायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. राज्य सरकारला मागणी आहे, की लोडशेडिंग करू नका. राज्य म्हणत असेल, की बाहेरून कोळसा आणायला परवानगी द्या तर ती आम्ही परवानगी देत आहोत. पण परवानगीची गरज नाही. राज्य सरकारने वीज खरेदी करावी आणि ती द्यावी. ते लोडशेडिंग करणार नाही म्हणत आहेत. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली लोडशेडिंग सुरूच आहे.
राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. काल मोहित कंबोज यांच्यावर हल्ला झाला. पोलखोल यात्रेवर दगडफेक झाली. हनुमान चालिसा म्हटली पाहिजे एवढीच त्यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरेंच्या घरासमोर आंदोलन सुरू आहे. तर पोलीस मूकभूमिका घेत आहेत. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका दानवे यांनी केली. राज्यातले सरकार हे अमर, अकबर, अँथनीचे असल्याचे ते म्हणाले.