पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अदानी प्रकरणी जेपीसी नेमण्याबाबतचं वेगळं मत मांडल्याने महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. काँग्रेस जेपीसीवर अडून आहे तर पवारांना मात्र जेपीसीची मागणी निरर्थक वाटत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अंतर निर्माण होत असल्याची आणि भाजप आणि राष्ट्रवादीत जवळीक वाढल्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. याबाबत थेट भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आलं. आता भाजप राष्ट्रवादीला डोळा मारणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर नकारार्थी दिलं. पण त्याचबरोबर महाविकास आघाडीतून एक एक पक्ष बाहेर पडतील असं भाकीतही केलं. त्यामुळे चंद्रकांतदादांच्या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सगळ्या निवडणूक होईपर्यंत माविआ एकत्रित राहील असं वाटत नाही. तिघे एकत्र लढले तरी आम्हाला फायदा होतो आणि वेगवेगळे लढले तरी आम्हाला फायदा होतो. त्यामुळे त्यांनी कशीही निवडणूक लढवली तरी आम्हालाच फायदा होईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच अदानी प्रकरणी शरद पवार यांनी बाजू घेतली. त्यावर काय बोलणार अजून. आम्ही कुणाला डोळा मारणार नाही. माझं कुणाच्याही डोळ्याकडे लक्ष नाही. दीड वर्षात अनेकजण गळून पडतील. भाजपविरुद्ध लढणं एवढं सोपं नाही, असं सूचक विधानही चंद्रकांतदादांनी केलं.
शिवसेना आणि भाजपच्या अयोध्या दौऱ्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अयोध्येला जाऊन रामाचं दर्शन घेण्यासारखा आनंद नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र अयोध्येला गेले आहेत. बाकी मला माहीत नाही. दोन्ही नेते अतिशय पॉप्युलर आहेत. त्यामुळे त्यांच्या महारॅलीला गर्दी होणारच. मी साधा मंत्री आहे. कुठे गेलो तर शेपाचशे लोक जमतातच. शिंदे आणि फडणवीस प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या रॅलीला गर्दी होणारच. एकनाथ शिंदे कोण आहेत? याची जगाला उत्सुकता आहे. एवढं मोठं बंड त्यांनी केलं. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी लोक उत्सफूर्तपणे येत आहेत, असंही ते म्हणाले.
सर्व विरोधी पक्षांना आवाहन आहे की मुद्द्यावर लढले पाहिजे. अजित पवार यांना जे कळले ते बाकीच्याना कधी कळणार?, असं एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं. अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. त्यावरही त्यांनी मिश्किल भाष्य केलं. मीडियावर अजितदादा रागावले आहेत. कदाचित ते उद्या माझ्यावर देखील रागवतील. मी अजित दादांना सांगणार आहे, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते आपण एकत्र बसूयात. चहा पिऊ यात. तुम्ही सूचना सांगा मी लिहून घेतो, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांना चिमटे काढले.
राज्यातील अवकाळी पावसाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आहे. त्यांनी आधी आढावा घेतला. मगच अयोध्येला गेले. ते तिकडे गेले आणि इकडे पाऊस झाला. मुख्यमंत्री अयोध्येत असले तरी तिथूनही ते काम करतील, असं त्यांनी स्पष्ट केले.