पुणे: देशाच्या राजकारणात कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा काँग्रेस पक्षाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने बाजी मारल्यानंतर आता काँग्रेसकडून कर्नाटक पॅटर्नच देशातील वेगवेगळ्या राज्यात राबवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. काँग्रेसला कर्नाटकात सत्ता मिळाल्यानंतर भाजपने मंजूर केलेल्या अनेक गोष्टींना काँग्रेसकडून तिलांजली देण्यात आली आहे. भाजपच्या काळात मंजूर झालेल्या अनेक गोष्टी आता काँग्रेसकडून रद्द करण्यात आल्याने राज्यातील भाजप आता आक्रमक झाली आहे.
कर्नाटकमध्ये भाजप सत्तेत असताना धर्मांतर बंदी कायदा आणि गोहत्या बंदी कायदा करण्यात आला होता. या दोन्ही कायद्यामुळे भाजपची देशभर जोरदार चर्चा झाली होती.
आता कर्नाटकात भाजपनंतर काँग्रेसचे राज्य आल्यानंतर काँग्रेसनेही भाजपच्या काळातील कायदे आणि इतर गोष्टींना रद्द करण्यास सुरुवात करणअयात आली आहे. त्यातील पहिला कायदा म्हणजे धर्मांतर बंदी कायदा रद्द करुन भाजपला जोरदार टोला लगावण्यात आला आहे. त्यानंतर गोहत्या बंदी कायद्यावरही काँग्रेसने महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने त्यावरूनही भाजपकडून टीका करण्यात आली आहे. तर आता शालेय अभ्यासक्रमावरूनही भाजपकडून काँग्रेसवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
भाजपच्या संवाद बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचा गेल्या साठ वर्षातील इतिहास मांडून त्यांनी अनेक गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. त्यातच आता कर्नाटकमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हेडगेवार यांचा शालेय अभ्यासक्रमात असलेला समावेश रद्द करण्यात आला आहे.
आता महाराष्ट्रातील भाजप आक्रमक होत पुण्यात भाजपकडून कर्नाटक सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला आहे. तसेच कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी पुण्यात भाजपने जोरदार आंदोलन करण्याची तयारी केली आहे.