पुणे: कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचं बळ वाढलं आहे. मात्र, या निवडणुकीत राज ठाकरे भाजपचा प्रचार करणार की नाही? अशी जोरदार चर्चा होती. मनसेकडूनही त्याबाबत काहीच सांगण्यात आलं नाही. पण राज ठाकरे यांनी दोन्ही मतदारसंघात सभा घ्याव्यात म्हणून भाजपने प्रयत्न सुरू केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज ठाकरे यांना सभा घेण्यासाठी गळ घालणार आहेत. बावनकुळे यांनीच त्याबाबतची माहिती दिली आहे.
कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी म्हणून आम्ही महाविकास आघाडीला विनंती केली होती. राज ठाकरे यांनाही विनंती केली होती. महाविकास आघाडीने आमची विनंती मान्य केली नाही. पण राज ठाकरे यांनी आमची विनंती मान्य केली.
राज ठाकरे यांनी प्रचारात सहभागी व्हावे म्हणून आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. ते येत नसतील तर त्यांचा प्रतिनिधी तरी प्रचारासाठी देण्यात यावा अशी विनंती आम्ही त्यांना करू, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
कसब्याचं आम्हाला आव्हान नसून आम्ही प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेत असतो. कसब्यात केंद्रीय पातळीवरून कुणीही प्रचारासाठी येणार नाही. राज्य पातळीवरचे नेते प्रचारासाठी येतील. अमित शाह यांचा दौरा आणि निवडणुकीचा काहीच संबंध नाही. शाह यांचा दौरा नियोजित होता, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 29 महिन्यांपासून कौटुंबिक संबध आहेत. देवेंद्र फडणवीस कधीच असत्याचा आधार घेत नाहीत. ते कधीच असत्य विधान करत नाहीत. ते त्यांच्या रक्तात नाही. जे घडलं आहे तेच फडणवीस बोलत असतात, असं त्यांनी पहाटेच्या शपथविधीच्या विधानावर स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या सभांचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार असच म्हटलं गेलं. देवेंद्रजीना अभिमन्यू करण्यात आलं आहे. सूड भावनेने कधी काम केलं नाहीय., त्यांचा विश्वासघात केला जातोय, असंही त्यांनी सांगितलं.
ज्या विरोधकांनी उद्योगांसाठी एकही बैठक घेतली नाही. ते आता उद्योग गेला म्हणत आहेत. फक्त बातम्या पेरण्याचे काम करत आहेत. पण एकही पेपर दाखवू शकले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
आसाम सरकारने महाराष्ट्रातील देवस्थानावर दावा केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आसाम सरकारला काय दावा करायचा तो करूद्या. मात्र आपली श्रद्धास्थान कायम राहणार आहेत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे किंवा अजित पवार आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हावे हा त्यांचा अंर्तगत प्रश्न आहे. मात्र त्यांचा मनसुबा यशस्वी होऊ शकला नाही. शिवसेनेचे नुकसान करून 2019 मध्ये 100 आमदार निवडून आणण्याचे आदेश होते, आता 2024 मध्ये बघूया कुणाचा मुख्यमंत्री होतो ते, असंही ते म्हणाले.