पुणे : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील परिस्थितीवर भाष्य केलंय. काँग्रेसनं उमेदवार उभा केला नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ज्यांना एबी फार्म दिला त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. या मतदारसंघाबाबत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. नाशिक मतदारसंघात आलेले सर्व अर्ज हे अपक्ष आहेत. पक्ष यासंदर्भातील निर्णय घेईल. जो काही गोंधळ सुरू आहे तो भारतीय जनता पक्षाचा नाही. हा काँग्रेसचा अंतर्गत गुन्हा आहे. एबी फार्म मिळाला की नाही. एबी फार्म मिळूनही तो त्यांनी का भरला नाही. भाजपच्या काही जणांनी अपक्ष फार्म भरले आहेत. त्याचा अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतील.
सत्यजित तांबे यांनी अपक्ष फार्म भरला. ते भाजपाचे उमेदवार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. दुसऱ्याचं घर फोडून स्वताचा आनंद साजरा करतात, असंही पटोले म्हणाले.
यावर बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. कुणाचंही घर फोडण्यासाठी भाजपाची स्थापना झाली नाही. इतरांची घरं फोडली गेली. इतर पक्षांनी ती कशी फोडली याचा इतिहास आपल्याला माहीत आहे. भारतीय जनता पक्षानी कुणाची घरं फोडलेली नाहीत. अपक्ष म्हणून कोणी पाठिंबा मागितला असेल, तर त्यावर वरिष्ठ स्तरावर पक्ष निर्णय घेईल. भाजपाची संस्कृती ही दुसऱ्याची घरं फोडण्याची नाही.
अमित देशमुख हे भाजपामध्ये येतील, असे संकेत निलंगेकर यांनी दिले. हर्षवर्धन पाटील म्हणाले, आमचे मित्र बऱ्याच पक्षांमध्ये आहेत. कोणी कोणत्या पक्षात प्रवेश करायचं. कोणी कोणत्या पक्षात विलीन व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भाजपात कोणी येत असतील तर आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करू.
कोणीही पक्षात येत असेल, तर त्याचं स्वागत करू. पक्षात असे निर्णय हे वरिष्ठ स्तरावरील कमिटीत होतात. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे असे महत्त्वाचे निर्णय घेतील.