पुणे : पुणे जिल्ह्यातील एका शिक्षणसंस्थेतील शिक्षक भरती घोटाळ्याची (Teacher recruitment scam) ईडीने स्वतःहून दखल घेतली आहे. बोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना ‘ईडी’ने (Enforcement Directorate) चौकशीसाठी बोलाविले आहे. येत्या दोन ऑगस्टला शिक्षक भरती घोटाळ्यात नेमक्या कोणत्या व्यक्तींचा समावेश होता, याबरोबरच अन्य प्रकरणांबाबत चौकशी करण्यात येणार आहे. शिक्षक भरतीमध्ये दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याने त्यात मनी लाँडरिंग (Money laundering) झाल्याचा संशय आहे. शिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती प्रकरणात मनी लाँडरिंग झाल्याने या प्रकरणाची ‘ईडी’ने स्वतःहून दखल घेतली. त्यामुळे या प्रकरणातील दोषींसह घोटाळ्यातील अन्य सहभागींची नावे पुढे येण्याची शक्यता आता नाकारता येत नाही.
पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथील एका शिक्षण संस्थेत काही वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती करण्यात आली होती. काही शिक्षणाधिकाऱ्यांच्या संगनमताने ही भरती झाल्याचे चौकशीत उघडकीस आले होते. त्यात 23 शिक्षकांची भरती बोगस झाल्याचे आढळले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात 19 ऑक्टोबर 2019 रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात पुणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, दत्तात्रय शेंडकर तसेच पुणे महापालिकेचे माजी शिक्षणाधिकारी रामचंद्र जाधव, प्रशासकीय अधिकारी मिनाक्षी राऊत, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्याशिवाय त्या संस्थांचालकाचादेखील समावेश आहे.
या शिक्षण संस्थेने उरुळी कांचन येथील त्यांच्या संस्थेत काही शिक्षकांची भरती केल्याचे दाखविले. त्या आधारावर राज्य सरकारकडून पगार काढून घेतले. त्यानंतर काही वर्षांनी त्याच शिक्षकांना पुन्हा आकुर्डी येथील संस्थेत समाविष्ट करून घेतले. त्यावरून बोगस शिक्षक भरती झाल्याचा प्रकार जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी उघडकीस आणला.
भुजबळ यांच्या तक्रारीनुसार 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये काहींनी अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविला तर काहींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत काही ठिकाणी पोलिसांनी काही कागदपत्रे तसेच बनावट शिक्के जप्त केले. त्यामध्ये शिक्षकांच्या नियुक्तीच्या मान्यतेबाबतचे लेटरपॅड तसेच नियुक्तीची पत्रे आढळलीत.