पुणे: एल्गार परिषदेतील शरजील उस्मानी (sharjeel usmani)याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादात आता ब्राह्मण महासंघानेही (Brahman Mahasangh) उडी घेत एल्गार परिषदेला लक्ष्य केले आहे. हिंदू धर्म नव्हे तर एल्गार परिषदच सडक्या मेंदूच्या लोकांनी भरल्याची टीका, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली. (Brahman Mahasangh take a dig at elgar parishad)
ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या सर्व लोकांना फैलावर घेतले. शर्जील उस्मानी या सडक्या मेंदुच्या व्यक्तीने एल्गार परिषदेत जी काही विधाने केली ती अनपेक्षित नव्हती. तो काय आणि अरुंधती रॉय काय अशी सडकी, कुजलेली विधाने करण्याची शक्यता आहे, अशी शंका आम्ही पोलिसांकडे व्यक्त केलीच होती. ती दुर्दैवाने खरी ठरली, असे आनंद दवे यांनी म्हटले.
शर्जील उस्मानी या मूर्ख आणि विकृत माणसाला अद्दल घडवण्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही बुधवारी सकाळी 11.30 वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही आनंद दवे यांनी सांगितले.
10 फेब्रुवारी हा हिंदू विजय दिवस आहे. 1771 साली याच दिवशी दिल्लीच्या लाल किल्यावर मराठ्यांचा भगवा फडकला होता. आम्ही हा दिवस हिंदू विजय दिवस म्हणून साजरा करणार आहोत. त्यासाठी गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी, यासाठी आम्ही राज्य सरकारकडे विनंती करणार असल्याचेही आनंद दवे यांनी सांगितले.
शरजील उस्मानी नावाचा कोणीतरी सडक्या डोक्याचा व्यक्ती एल्गार परिषदेत हिंदूविरोधी वक्तव्य करतो. त्यानंतरही राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही. राज्यात मोगलाई आली आहे का, हिंदू रस्त्यावर पडलेत का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
राज्याचे गृहमंत्री म्हणतात या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करू. मात्र, शरजील उस्मानीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यामध्ये तो हिंदू समाजाला स्पष्टपणे सडका म्हटल्याचे ऐकायला मिळते. त्यानंतरही राज्य सरकार ऐकणार नसेल तर भाजप शांत बसणार नाही. आम्ही आंदोलन सुरु करू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
एल्गार परिषद ही समाजात तेढ पसरवण्यासाठी आणि आग ओकण्यासाठीच आयोजित केली जाते. याचा अनुभव असूनही सरकारने एल्गार परिषद आयोजित करण्यास परवानगी दिलीच का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यामुळे ही सरकारची मिलीभगत आहे का, अशी शंका उत्पन्न होते. मात्र, सरकारने शरजील उस्मानीविरोधात कारवाई केलीच पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार
हिंदू समाज सडका झालाय म्हणणारा शरजील उस्मानी कोण आहे?
‘शिवसेनेला सत्तेसाठी मिंधी, कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन’, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
(Brahman Mahasangh take a dig at elgar parishad)