पुणे: आपल्या भोवती ट्रॅप रचला होता. त्यामुळे अयोध्या दौरा (Ayodhya tour) रद्द केल्याचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं. राज ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपवरच निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी त्यावर मोठं विधान केलं आहे. बृजभूषण सिंह यांना थोपवण्यासाठी आम्ही काय काय केलं हे ओपनली सांगता येत नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मात्र, अयोध्या दौरा हा आपल्यासाठी ट्रॅप होता या राज ठाकरे यांच्या विधानावर त्यांनी भाष्य केलं नाही. मनसे सैनिकांवर अयोध्येत गुन्हे दाखल करून त्यांच्यामागे कोर्ट कचेरी लावण्याचा डाव होता, या राज ठाकरे यांच्या आरोपावरही त्यांनी भाष्य केलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे ही मागणी राज ठाकरे यांनी आज केली. आम्ही आधीपासून मागणी केलीय. राज ठाकरेना काय वाटतं ते सांगितलं. ते समर्थ आहेत. पण हा भाजपचा छुपा ट्रॅप आहे हे सांगायला सचिन सावंत एवढे मोठे झाले नाहीत. बृजभूषण यांना थांबवण्यासाठी काय केलं हे ओपनली सांगता येणार नाही. बृजभूषण यांची भूमिका वैयक्तिक होती, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
शरद पवारांनी ब्राह्मण समाजाला खूप लाथा मारल्या. आता सॉरी बोलत आहेत. पवारसाहेब न्यायालयाच्यावर झालेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना उत्तर भारतात प्रवेश दिला जाणार नाही, असं स्पष्ट केलं. उत्तर भारतात कुठेही जा तुम्हाला विरोध होईल. आम्ही सांगितलं माफी मागितल्या शिवाय येऊ देणार नाही. 45 वर्षानंतर आनंदोलन सुरू आहे. त्यात हिंदू आणि मुस्लिम आहेत. त्यांची एकच मागणी आहे. ती म्हणजे राज ठाकरे यांनी माफी मागावी, असं भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा काही वाद नाही. 2008 पासून त्यांनी राजकारण सुरू केले. आपल्या लोकांना त्रास झाला. नोकरी व्यावसाय सोडावा लागला. उत्तर भारतीय दोन नंबरचे नागरीक म्हणून राहत आहेत. महाराष्ट्रात अघोषित 370 कलम चालू आहे. ते माफी मागत नाही तर त्यांना का येऊ द्यायचे? असा सवाल सिंह यांनी केला.