पुणे: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांना ईडीने (ED) अटक केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रालयासमोरी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. मराठा आंदोलक असो की ओबीसी आंदोलक यांना मंत्रालयाच्या परिसरात फिरकू दिले जात नाही. त्यांना नियम आणि कायदे दाखवले जातात. मग मंत्र्यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलने कशी केली? त्यांना नियम आणि कायदे लागू होत नाही का? त्यांना आंदोलनाची परवानगी कुणी दिली? या मंत्र्यांवर कारवाई करण्यात येणार आहे का? याची चौकशी केलीच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे.
मंत्रालयाच्या परिसरात दूरदूर पर्यंत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना परवानगी दिली जात नाही. ओबीसींना आंदोलन करायला परवानगी नाही. अनुसूचित जाती, जमातींना परवानगी नाही. आजपासून छत्रपती संभाजी राजे उपोषणाला बसणार आहेत. त्यांनाही परवानगी नाही. मग महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ रस्त्यावर कसे बसते? कारण तुमच्या हातात सत्ता आहे. तुम्हाला परवानगी. मंत्रालयातील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ बसायला तुम्हाला परवानगी कशी? ही परवानगी कुणी दिली? त्याचीही चौकशी झाली पाहिजे. हे मंत्री बेकायदेशीरपणे आंदोलनाला बसले का? त्यांच्यावर बेकायदेशीर जमावबंदीचे कलमं लागू होणार का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.
बेनामी संपत्तीच्या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. ईडीने अटक केली तरी त्यांचा राजीनामा घेणार नाही असं आघाडीचे नेते म्हणतात. याचा अर्थ 1993च्या बॉम्बस्फोटात सहभागी झालेल्या दाऊदच्या गुन्हेगारांना हे समर्थन करत आहेत. हे पाठबळ देत आहेत. त्यावेळचे बॉम्बस्फोट कसे बरोबर होते. त्यांना पाठबळ देणारे नवाब मलिक हे कसे बरोबर होते हे सांगण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि भाजप हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशारा त्यांनी दिला.
सुरुवातीला समझने वालों को इशारा काफी अशा पद्धतीने आम्ही निदर्शने केली. आता या विषयावर तीव्र निदर्शने केली जाणार आहेत. एखादा सरकारी कर्मचारी अटक झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्याला सस्पेंड केलं जाते. चार्जशीट सबमिट झाल्यानंतर त्याला कामावरून काढून टाकायचं असतं. जरी आम्हाला हा कायदा लागू होत नसला तरी मिनिस्टरने हे संकेत पाळायला नको का? त्यांच्या नेत्यांनी हे सांगायला नको का? मलिकांचा राजीनामा का नाही घेतला जात? तो झाला नाही तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
संबंधित बातम्या:
विधानसभा निवडणूक होताचा इंधन दरवाढीचा झटका; मार्चमध्ये पेट्रोल 8 रुपयांनी महागणार?