न्यायालयाच्या अवमान प्रकरणी याचिका दाखल करणार, भाजपचा आघाडीला इशारा; कारण काय?

| Updated on: Apr 25, 2021 | 5:24 PM

उच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी भाजप आघाडीच्या विरोधात अवमान याचिका दाखल करेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

न्यायालयाच्या अवमान प्रकरणी याचिका दाखल करणार, भाजपचा आघाडीला इशारा; कारण काय?
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us on

पुणे : “माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चालू आहे. असं असलं तरीही ही चौकशी म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून यंत्रणेचा दुरुपयोग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप म्हणजे उच्च न्यायालयाचा अवमान आहे. भाजप त्याच्या विरोधात अवमान याचिका दाखल करेल,” असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. ते रविवारी (25 एप्रिल) पिंपरी येथे बोलत होते (Chandrakant Patil warn MVA about Contempt of court case).

चंद्रकांत पाटील म्हणाले, “उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचा आदेश देताना गरज असल्यास गुन्हा नोंदविण्याचाही आदेश दिला होता. न्यायालयाचे निकालपत्र वाचले तर हे स्पष्ट होते. त्यामुळे केवळ चौकशीचा आदेश दिला होता तरीही गुन्हा नोंदवून छापे मारले ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची तक्रारही निरर्थक आहे.”

“शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सोईच्या भूमिका असतात. त्यांना अनुकूल निकाल लागला की न्यायालय चांगले आणि प्रतिकूल आदेश आला की शंका उपस्थित करतात. ईव्हीएम मशिनबाबतची त्यांची भूमिकाही निवडणुकीत विजय मिळाला अथवा पराभव झाला यानुसार बदलते. अशी ‘हम करे सो कायदा’, ही त्यांची भूमिका लोकशाहीत चालणार नाही,” असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

“विश्वासघात झाल्यामुळे भाजप सत्ताधारी होण्याच्या ऐवजी विरोधी पक्ष”

चंद्रकांत पाटील म्हणाले, “भारतीय जनता पार्टीला जनतेने विधानसभा निवडणुकीत जनादेश दिला होता. विश्वासघात झाल्यामुळे भाजप सत्ताधारी होण्याच्या ऐवजी विरोधी पक्ष झाला. परंतु, विरोधी पक्ष म्हणूनही भाजप आपली भूमिका गंभीरपणे आणि आक्रमकपणेच पार पाडेल. सत्ताधाऱ्यांवर अंकूश ठेवण्याची विरोधी पक्षाचे काम भाजप चांगल्या रितीने पार पाडतच राहील.”

प्राणवायूच्या पुरवठ्यासाठी मोदींनी झटपट निर्णय घेतल्याबद्दल आभार : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शनिवारी ऑक्सिजनसाठीच्या उपकरणांवरील आयातकर व आरोग्य सेस तीन महिन्यांसाठी पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रासाठी 8 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून देण्याचा पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स (पीपीसीआर) या नागरिकांच्या उपक्रमाचा प्रयत्न यशस्वी होईल. प्राणवायूच्या उपलब्धतेसाठी झटपट निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.”

“मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष आणि पीपीसीआरचे समन्वयक उद्योजक सुधीर मेहता यांनी महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांसाठी हजारो ऑक्सिजन सिंगापूर येथून मागवण्याची कल्पना मांडली. ही उपकरणे तेथे उपलब्ध असून झटपट आणता येतील. त्यासाठी पीपीसीआर पुढाकार घेईल आणि सिंगापूर येथील जागतिक गुंतवणूकदार कंपनी टेमासेकच्या सहाय्याने आयात करेल,” अशी माहिती त्यांनी दर्शविली.

हेही वाचा :

विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो; चंद्रकांतदादांनी बोलून दाखवली सल

अनिल देशमुखांप्रमाणेच अनिल परब आणि संजय राऊतांचीही चौकशी करा : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे?; नाना पटोलेंचा सवाल

व्हिडीओ पाहा :

Chandrakant Patil warn MVA about Contempt of court case