इंदापूर | 9 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली आहे. छगन भुजबळ यांनी ओबीसीच्या मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. यापुढे तुम्ही दादागिरी केली तर आम्ही तुला दादागिरीनेच उत्तर देऊ, असा इशाराच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच यावेळी भुजबळ यांनी पोलिसांनाही सावध राहण्याचा सल्ला दिला. तुम्ही कारवाई का करत नाही. उद्या प्रकरण हाताबाहेर गेलं तर तुम्ही हातात बंदुका घेऊन उभं राहणार आहात का?, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
इंदापूरमध्ये ओबीसी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मी काही बोललो तर अनेक विचारवंत बोलायला लागतात. महाराष्ट्रात अशांततेचं वातावरण पसवरलं जातं. दोन जातीत भांडणं लावली जात असल्याचं सांगितलं जातं. ते जरांगे 15 दिवस फिरत आहेत. सकाळपासून त्याची मिटिंग सुरू होते. आपली मिटिंग रात्री 10 वाजता बंद होते. त्यांची मिटिंग रात्री 12 ला, रात्री 1 ला, रात्री दोनला. त्यांना परवानगी आहे की नाही माहीत नाही. पोलीसही कारवाई करत नाही. ते म्हणेल तो कायदा. कायदा फक्त तुम्हाला आणि आम्हाला? त्यांनी काही बोललं तरी त्याच्या बातम्या येणार. आपण गप्प बसणार. 15 दिवसाने बोललं तर लगेच सुरू. महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचं म्हटलं जातं. मी फक्त 15 दिवसाने बोलतो. पण एक सौ सुनार की एक लोहार की. त्यामुळे थोडं बोलावं लागतं. सर्वच ऐकून घेण्याची सवय आम्हाला नाही. इथे कुणालाच नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
मला सांगा या राज्यात अशांतता कोण माजवतंय? आम्ही माजवतोय? छगन भुजबळ म्हणाले का तलवारी घेऊ, कुऱ्हाडी घेऊ? ते यवतमाळला म्हणाले. 24 तारखे नंतर तुझा हिशोब करतो. तुला दाखवतो असं ते म्हणाले. काय चाललंय? मराठा समाजाला विरोध नाही. आमचा विरोध दादागिरी आणि झुंडशाहीला आहे. दादागिरी सुरू राहिली तर दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ. आमच्यावर जबाबदारी आहे. नंतर बोलू नका अशांतता पसरवली. त्यांना सांगा बोलताना नीट बोला. पोलिसांवरील हल्ले थांबवा, असा इशाराच छगन भुजबळ यांनी दिला.
राज्यात अशांतता करतंय कोण? राज्यात शांतता असेल तर उद्योग धंदे येतील, बेरोजगारी दूर होईल. राज्यातील उद्योगधंदा वाढेल हे मान्य. पण अशांतता निर्माण करतं कोण? याचा विचार करण्याची गरज आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
पोलिसांना सांगायचं तुम्ही वेळेवर ॲक्शन घेतली नाही तर पुढे तुम्ही काहीच करू शकणार नाही. ते अशांतता माजवतील. तेव्हा तुम्ही काय करणार? केवळ रिव्हॉल्वर घेऊन तुम्ही उभे राहणार का?, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला.