छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीत, पण…, अमोल कोल्हे यांनी भाजपला सुनावलं

| Updated on: Nov 20, 2022 | 5:18 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांनी माणूस हा धर्मासाठी नाही. तर धर्म हा माणसासाठी आहे, असं सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीत, पण..., अमोल कोल्हे यांनी भाजपला सुनावलं
Follow us on

पुणे : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी अत्यंत संतापजनक, उद्वेगजनक वक्तव्य केलंय. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची पाच वेळी माफी मागितली. मग, अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमकं खुपतय काय तुम्हाला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता बोलतात, तर कधी राज्यपाल बोलतात. वारंवार अशी बेताल वक्तव्य केली जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचं असं का बोललं जातं, असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय.

धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये. हे शिवाजी महाराज यांनी या मातीत रुजविलं. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी हातात हात घालून लोककल्याणाचं काम करावं, असा आदर्श शिवाजी महाराज यांनी घालून दिला. हा आदर्श तुम्हाला खुपतोय का.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी माणूस हा धर्मासाठी नाही. तर धर्म हा माणसासाठी आहे, असं सांगितलं. शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र केलं. एका उदात्त कारणासाठी कसं काम केलं जाऊ शकतं हे दाखवून दिलं. सर्वसामान्य माणसाचं राज्य, आदर्श राज्य कसं असावं याचा वस्तुपाठ घालून दिला.

जगभरातले लोकं कौतुक करत असलेला गनिमी कावा तुम्हाला समजला नसेल तर काही पुस्तकं पाठवितो. काही लेख पाठवितो. भलेभले लोकं औरंगजेबाच्या दरबारात माना खाली घालून उभे राहत होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवली. हिंदुस्थानातल्या मातीला स्वाभिमान काय असतो, ते शिकवलं.

अमोल कोल्हे म्हणाले, अशा शिवाजी महाजारांविषयी तुम्ही अशी वक्तव्य करता. इंडियन आर्मीच्या सगळ्या बटालीयन या देवाच्या नावानं आहेत. पण, फक्त मराठा बटालीयनचा वॉर क्राय हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आहे. छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीत. पण, ते आमच्यासाठी देवापेक्षा कमी नक्कीचं नाहीत.

शिवाजी महाराज आमची अस्मिता होते, आहेत आणि यापुढंही अस्मिता राहतील. त्यामुळं सुधांसू त्रिवेदी आपण आपलं वक्तव्य मागं घ्यावं. भाजपनं शिवाजी महाराज यांच्याविषयी काय भूमिका आहे, हे स्पष्ट करावी, असंही अमोल कोल्हे म्हणाले. महाराष्ट्राची अस्मिता दुखावल्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी, असंही कोल्हे यांनी मागणी केली.