पुणे : पुण्यात पीएमपीएमएलची (PMPML) वाहतूक ठप्प झाली आहे. सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसची वाहतूक ठप्प झाली आहे. अचानक पुकारलेल्या संपामुळे (Strike) प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. पीएमपीएमएलकडे खासगी ठेकेदारांचे पैसे थकल्यामुळे हा बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान, पीएमपीएमएलच्या खासगी ठेकेदारांना प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली आहे. तसेच मेस्मा (MESMA) कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पीएमपीएमएलच्या खासगी ठेकेदारांनी अचानक बंद पुकारल्याने प्रशासनाने हा इशारा दिला आहे. या बंदमुळे शहरातील जवळपास एक हजार बसेस डेपोत थांबून आहेत. तर नेमक्या कार्यालयाच्या वेळेतच बस मिळत नसल्याने प्रवाशांचेही हाल होत आहेत. नुकताच एसटीचा संप मिटला आहे. त्यादरम्यान प्रवाशांचे हाल झाले होते. आता पुणेकरांना पीएमपी बंदचा फटका सहन करावा लागत आहे.
रात्री बारापर्यंत या संपाची कोणतीही कल्पना प्रशासनाला देण्यात आली नव्हती. खासगी ठेकेदारांचे प्रशासनाकडे काही पैसे थकले आहेत. त्यामुळे संप पुकारल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेस सध्या डेपोमध्ये थांबून आहेत. दरम्यान, दुपारपर्यंत यावर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.
आज जवळपास 700 बस रस्त्यावर उतरल्याच नाहीत. एकतर उन्हाळ्याचा त्रास त्यात बस नसल्याने पुणेकरांचे प्रचंड हाल झाले होते. ठेकेदारांना सहा महिन्यांची थकबाकी मिळाली नाही, या कारणास्तव हा संप पुकारला. रक्कम न मिळाल्यास सेवाही बंद करण्याचा इशारा देण्यात आला. ठेकेदारांना थकीत 99 कोटी 93 लाख 14 हजार 249 देणे आहे. यापैकी काही दिवसांपूर्वी 66 कोटी 50 लाख देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही गाड्या पुरवठादार ठेकेदारांनी गाड्या उपलब्ध करून दिल्या नाहीत.