पुणे : 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी (Pune Ganeshotsav) पुणे शहर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. शनिवारी रात्री 9 ते रविवारी पहाटे 2 या दरम्यान अनेक संवेदनशील आणि मोक्याच्या ठिकाणांची तपासणी पोलिसांनी केली. पोलिसांनी (Pune city police) गुन्हेगारी नोंदी असलेल्या 3,295 व्यक्तींची तपासणी केली आणि 84 गुन्हेगारांना अटक केली आहे. यापैकी 42 जणांना परवाना नसताना बंदुक बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तर 25 जणांना मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांतर्गत इतर 17 जणांनाही अटक केली आहे. त्याबरोबर 17 अन्य गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच यापुढेही हे कोम्बिंग ऑपरेशन सुरूच राहणार आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगार, पाळत ठेवणारे, बाहेरील, वाँटेड आणि फरार गुन्हेगारांची तपासणी करणे हे या ऑपरेशनचे उद्दिष्ट होते. पोलिसांकडून संबंधित हद्दीत स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायद्यान्वये 41 गुन्हे दाखल केले आहेत. शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी 49,150 रुपये किंमतीची 309 लिटर देशी दारू आणि दोन मोबाइल फोन जप्त केले. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पोलिसांनी सहा गुन्हे दाखल करून 13 जणांना अटक केली. छाप्यादरम्यान पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख 21,260 रुपये जप्त केले.
कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान, वाहतूक पोलिसांनी 1,249 संशयित वाहन चालकांची चौकशी केली आहे. विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 112,600 रुपये दंड वसूल केला आहे. नाकाबंदी दरम्यान, पुणे स्टेशन पोलीस युनिटने 2,252 वाहन चालकांची चौकशी केली आणि 34 गुन्हेगारांकडून 8,300 रुपये वसूल केले. पोलिसांनी शहरातील 492 हॉटेल आणि लॉज, 145 एसटी, बस, ऑटो स्टँडवर शोधमोहीम राबवली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी कारवाईचे निरीक्षण केले. पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले, की शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी अशा प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन भविष्यातही सुरूच राहतील.