पुणे : काही वेळापूर्वीच किरीट सोमय्यांचा (Kirit Soamya) पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर सर्व विरोध झुगारून भाजपने सत्कार केला. याच पायऱ्यांवर गेल्या शनिवारी किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर आज भाजपने (Bjp) जोरदार शक्तीप्रदर्शन करत सत्कार केला. मात्र आता काँग्रेसने (Congress) त्या पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा निषेध केला आहे. किरीट सोमय्या यांच्या येण्यामुळे याठिकाणी मोठा राडा झाला. पुणेकरांच्या प्रश्नासाठी किरीट सोमय्या कधी आले नाहीत, मात्र आता फक्त कंगावा करायला सोय्या इथे येत आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध आहे. अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेसकडून देण्यात आलीय. तसेच आम आदमी पार्टीनेही पुण्यात महापालिकेसमोर आंदोलन केलं आहे. किरीट सोमय्या येणार होते म्हणून कुणालाही प्रवेश दिला नाही, गिरीश बापट दिडशे लोकं आत घेऊन घुसतात, हे निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीकडून देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंचं घोटाळेबाज सरकार
संजय राऊतांनी बेनामी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी हट्ट केला नसता तर लोकांचा जीव वाचला असता. हात तोडा, पाय तोडा, जीव गेला तरी चालेल. काहीही करा पण किरीट सोमय्या यांना गप्प बसवा असे आदेश शिवसेनेकडून देण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. काहीही झालं तरी आम्ही गप्प बसणार नाही. या घोटाळेबाजांना जेलमध्ये बसवणार, असा निर्धारही किरीट सोमय्यांनी केला आहे. कोविडची कमाई बंद झाल्यानंतर संजय राऊत वाईन कंपनीत कमाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुजीत पाटकर आणि संजय राऊत यांच्या पार्टनर्शिप आहे, असा थेट आरोप सोमय्यांनी केला आहे. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागणार आहे, कोविडमधील घोटाळे बाहेर आल्यावर यांना तोंड दाखवायला जागा मिळणार नाही, असेही सोमय्या म्हणाले आहेत.
विरोध झुगारून भाजपकडून सत्कार
एवढा गदारोळ झाल्यानंतर आज सोमय्या पुन्हा पुण्यात गेले आहेत. ज्या पायऱ्यांवर सोमय्यांना धक्काबुक्की झाली त्याच पायऱ्यांवर त्यांचा सत्कार करण्याचा घाट भाजपने घातला होता. मात्र काँग्रेसकडून लगेच विरोधाची हाक देण्यात आली. महापालिकेनेही सोमय्यांच्या सत्काराला परवानगी नाकारली. मात्र ज्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली त्याच पायऱ्यावर भाजपने विरोध झुगारून सोमय्यांचा सत्कार केला आहे. आज सोमय्यांच्या स्वागताला भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी गर्दी अनावर झाल्याने पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर करण्यात आला. त्यामुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे. भाजपकडून यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.