पोर्शे कार अपघात प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. पोर्शे कार अपघात प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. पोलीस आयुक्तांनी फोन केला म्हणून कारवाई झाली नाही का?, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. आमदाराचे फोन कुणा-कुणाला गेले, याची चौकशी करा. यात सगळ्यांची भूमिका ही संशयास्पद आहे. राजकीय व्यक्तीचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नाही, असा मुद्दा विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
पोर्शे अपघात प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता, यावर मी आक्षेप घेतला. आमचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी वस्तुस्थिती मांडली. गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. त्यांना वाचवणाऱ्यांना पण शिक्षा झाली पाहिजे. आरोपी श्रीमंत आहे. तेव्हा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
पोर्शे अपघात प्रकरणात राजकीय दबाव होता. त्याचे पुरावे आहेत. घटना घडते आणि पोलीस सुस्त होते. गुन्ह्याची नोंद नीट होत नाही. रक्ताचे नमुने बदलले जातात. सगळं प्रकरण संशय निर्माण करणारं आहे. हे प्रकरण यामागे राजकीय पाठबळ आहे वाचवण्यात हे समोर आलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत कारवाई झाली पाहिजे. आम्ही हे प्रकरण सोडणार नाही. जो अडकला असेल डॉक्टर, पोलीस त्यावर कारवाई झाली पाहिजे. अजय तावारे हा बदमाश माणूस आहे. मेलेल्याच्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे लोक आहेत. त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे, असंही वडेट्टीवार म्हणाले.
आमदार सुनिल टिंगरे यांची चौकशी झाली पाहिजे. ती गाडी रजिस्ट्रेशन नसताना फिरत होती. ही गाडी दिसली नाही का? कुणाचा फोन होता? मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने फोन केला. याची चौकशी व्हावी. राज्यातील कोणी असू दे. पुणेकर की बारामतीकर असू दे… डॉक्टरांना वाचवण्याचं काम अनेक वर्षापासून सुरू आहे. चौकशी करायला येत आणि बिर्याणी मागवता… ही चौकशी आहे का?, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.