इंदापूर: काँग्रेसने पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. इंदापूरसहीत संपूर्ण राज्यात काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं सांगत वडेट्टीवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना आव्हान दिलं आहे. त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत तणातणी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (congress will contest indapur constituency, says vijay wadettiwar)
काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इंदापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना इंदापूर तालुक्याचा पुढील आमदार काँग्रेसचाच असेल असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडले होते. पटोले यांचं हे विधान ताजं असतानाच इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस शंभर टक्के लढवणारच. ही जागा कुणालाही सोडण्यात येणार नाही, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यामुळे अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे टेन्शन वाढले आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील विधानसभेच्या जागेचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची की काँग्रेसची यावर अनेक वादंग निर्माण झाले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला होता. या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी निवडणुकीपूर्वीच तुटते की काय? असं चित्रं तेव्हा निर्माण झालं होतं. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जातात. त्यांच्या विरोधात तत्कालीन कॉंग्रेसचे नेते आणि आता भाजपात असणारे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे भरणे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमध्ये 20 वर्षे राहून अनेक मंत्री पद भूषवली होती. ते काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसच्या अनेक मोठ्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असायचा. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाचाला कंटाळून काँग्रेस सोडत आहे, असा आरोप करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी इंदापूरमध्ये प्रचार करताना देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मंत्री महादेव जानकर यांनी हर्षवर्धन पाटील यांना तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करा, काँग्रेसमध्ये काही खरं राहिलेलं नाही असं वक्तव्य केलं होतं. परंतु हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून स्वत: राहुल गांधी प्रयत्न करणार असल्याचं मीडियाशी बोलताना वारंवार सांगितलं होतं. त्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील मध्यस्थी करणार होते, असं पाटील सांगत होते. परंतु ऐनवेळी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने इंदापूरची जागा आपोआप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली. मात्र आता पुन्हा एकदा मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याने काँग्रेस इंदापूरमध्ये नवीन चेहरा देणार आहे का? याची चर्चा रंगली आहे. तसेच तालुक्यातील दिग्गज नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे का? याकडेही लक्ष लागले आहे.
इंदापूर विधानसभेची जागा यापूर्वी एकत्रित निवडणूक लढवलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी महत्वाची मानली जात होती. या पूर्वी दत्तात्रय भरणेंच्या एका कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते व सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावत आपण दत्तात्रय भरणे यानांच इंदापूरची उमेदवारी देणार असल्याचं जाहीर केलं होतं. आघाडीत बिघाडी झाली तरी बेहत्तर. पण मात्र इंदापूरची जागा सोडणार नाही, अशी घोषणा अजित पवार यांनी केली होती. त्यामुळे ही जागा पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याचं सांगितलं जात आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील भाजप उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे होते. या अटीतटीच्या लढतीत भरणे यांचा अवघ्या 3310 मतानी विजय झाला होता. पुन्हा एकदा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. भविष्यात ही इंदापूरची जागा कायम स्वरूपी राष्ट्रवादीला राहील अशी परिस्थिती आज निर्माण असताना आघाडी सरकारमधील मंत्र्यांने इंदापूरची जागा आम्ही लढविणार ती सोडणार नाही, असे वक्तव्य केल्याने अजित पवार यांना हा डिवचण्याचा प्रकार दिसून येत असल्याची चर्चा सुरू आहे. (congress will contest indapur constituency, says vijay wadettiwar)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 August 2021 https://t.co/KwVyAQYqAo #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2021
संबंधित बातम्या:
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी, प्रभाग रचनेसाठी पिंपरीत समिती नियुक्त
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी मुदतवाढ, आज संध्याकाळपर्यंत घेऊ शकणार प्रवेश, वाचा सविस्तर
पिंपरी चिंचवडमध्ये वाहन खरेदी 37 टक्क्यांनी घटली! कोरोना, इंधन दरवाढीचा परिणाम?
(congress will contest indapur constituency, says vijay wadettiwar)