पुणे : ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे आपल्या एका व्हिडीओवरुन वादात अडकल्यात. संतांनी रेड्याला शिकवलं. पण माणसांना कुठं शिकवलं, असं सुषमा अंधारे या व्हिडीओत म्हणतायत. संत ज्ञानोबा माऊलींनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते. तोच दाखला देत अंधारेंनी हे वक्तव्य केलं. पण त्यावरुन वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आणि त्यानंतर अंधारेंनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली. त्या म्हणाल्या, वारकरी संप्रदायाला जर वाटत असेल, ताई तुमचं चुकत आहे. तर दोन्ही हात जोडून माफी मागताना गैर वाटणार नाही.
ज्या व्हिडीओवरुन रोष व्यक्त होतोय, तो व्हिडीओ जुना म्हणजेच ठाकरे गटात प्रवेश करण्याआधीचा आहे असं सुषमा अंधारेंचं म्हणणंय.
अंधारेंच्या त्या व्हिडीओवरुन वारकरी संतापले. राजकारण राजकारणाच्या बाजूला ठेवावं. अशा बाईनं टीका करणं योग्य नसल्याचं वारकऱ्यांचं म्हणणंय. तर इकडे आळंदीत वारकऱ्यांनी अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
पण ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा सुद्धा भाजपचाच स्टंट असल्याचा आरोप अंधारे यांनी केलाय. ज्ञानोबा रायांवर टिप्पणी केल्यानं, वारकऱ्यांना जे बोलायचं होते ते बोललेच. पण भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले आणि अंधारेही आमनेसामने आलेत.
ठाकरे गटात आल्यापासून सुषमा अंधारे शिंदे गटावर तुटून पडतायत. गेल्या 2 महिन्यांपासून त्यांची महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. यात्रेतून त्यांनी शिंदे गटातील आमदारांचेही जुने व्हिडीओ लावून समाचार घेत आहेत. पण आता अंधारेंचाच सोशल मीडियावर जुना व्हिडीओ लागल्यानं त्यांच्यावरच माफी मागण्याची वेळ आलीय.