पुणे : जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणून महाराष्ट्रात आणि ते सुद्धा पुण्यात शिरकाव केला आहे. दुबईहून आलेल्या पुण्यातील दाम्पत्याला कोरोनाची (Corona Virus cases tested positive in Pune) लागण झाली आहे. यापैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, तर दुसऱ्याचा रिपोर्टची आज येणार आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात या दोघांवरही उपचार सुरु आहेत. (Corona Virus cases tested positive in Pune)
दुबईहून आलेल्या या रुग्णांना तातडीने नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करुन तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आलेली नाहीत. सदर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहितीही घेतली जात आहे. या रुग्णांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
पुण्यात 200 खाटांचे तात्पुरते रुग्णालय सज्ज
दरम्यान, शहरात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने अवघ्या काही तासात 200 खाटांचे तात्पुरते रुग्णालय सुरु केले आहे. दोन इमारतीत हे तातडीचे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. राजयोग सोसायटी आणि सणस मैदानातील इमारतीत हे रुग्णालय सुरु केलं आहे.
या ठिकाणी कोरोनाची लागण झालेल्या 2 रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टरांचे पथक आणि इतर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पुढील काही तासात ही रुग्णालये सुरु केली जाणार आहेत.
पती-पत्नीला कोरोना
दरम्यान, पुण्यातील कोरोनाचे रुग्ण हे पती-पत्नी आहेत. ते वीणा ट्रॅव्हल्सने 1 मार्चला दुबईवरुन आले होते. 6 मार्चपर्यंत त्यांना कोणतीही लक्षणं दिसली नाहीत. मात्र, पत्नीला कोरोनाची लक्षणं जाणवायला लागले. म्हणून त्यांनी तपासणी केली. दोघांचीही रक्त तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटीव्ह निघाले. यानंतर तातडीने त्यांना विलिनीकरण कक्षात उपचार सुरु केले आहेत.” अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.
आरोग्य मंत्री राजेश टोपे एक्स्क्लुझिव्ह
दरम्यान हे दाम्पत्या 1 मार्चला दुबईहून पुण्यात लँड झाले. त्यानंतर 7 मार्चपर्यंत ते घरी होते. मग त्यांना थोडा त्रास होऊ लागला. त्यांनी तातडीने रुग्णालयात चाचणी केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु केले. यानंतर ते ज्या विमानाने आले त्या ठिकाणच्या 40 जणांची तपासणी सुरु आहे. तसेच त्या महिला ज्या ठिकाणी योगा क्लासला जात होत्या त्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. त्या दाम्पत्याचा ज्या ठिकाणी संपर्क आला आहे, त्यांच्या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. पुढील 14 दिवस ही सर्व मंडळी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु आहे, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.
केंद्रीय डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार
केंद्राच्या प्रशिक्षित डॉक्टरांच्या निगराणीखाली महिलेला ठेवण्यात आलं आहे. ट्रिपल लेयर मास्क वापरले जात आहेत. महिलेला पुढील 14 दिवस निगराणीखाली ठेवण्यात येईल. कोणीही भयभीत होण्याचं कारण नाही. केरळमध्येही तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, मात्र त्यांच्यावर उपचाराअंती प्रतिकारक्षमता वाढवण्यात यश आलं आहे.
कोरोना 80 टक्के सौम्य, 10 ते 15 टक्के गंभीर, तर 5 टक्के अतिगंभीर स्वरुपाचा असतो. यामध्ये 2 ते 5 टक्के मृत्यूदर आहे. त्यामुळे काळजी घ्या, होळीला गर्दी करु नका. पण चिकन-मटण खाऊ नये अशा अफवा धादांत खोट्या आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी हे भारतीयांसाठी नियमित आजार आहेत. त्याचा अर्थ कोरोना झाला, असा गैरसमज करुन घेऊ नये. अन्न व्यवस्थित शिजवून खावं. विशिष्ट उच्च तापमानावर कोरोनाचे विषाणू जिवंत राहू शकत नाहीत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द : अजित पवार
काल पुण्यात दोन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, याची मी माहिती घेतली आहे. सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आम्ही केंद्र सरकारला कळवलं आहे. विमानतळावर बारकाईने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी बोललो आहे. आज जरी सुट्टी असली तरी या कामाची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
संबंधित बातम्या