आंबेगाव, पुणे : मागील आठ दिवसापासून भीमाशंकर आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस (Heavy rain) पडत आहे. अशातच महावितरणच्या विद्युत तारा ठिकठिकाणी तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. भीमाशंकर परिसरातील निगडाळे येथील डोंगरावर जनावरे माळरानावर चरत असताना विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारा तुटल्याने दोन पाळीव जनावरांचा दुर्दैवी मृत्यू (Cattle dead) झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथे वादळी वाऱ्याने विजेची तार दोन दिवसांपासून तुटून पडली आहे. महावितरण (MahaVitaran) विभागाला वीज प्रवाह खंडित करण्याबाबत फोनवरून सांगण्यात आले होते, पण महावितरण अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्याकडे दुर्लक्ष करून वीज प्रवाह खंडित न करता चालू ठेवल्याने गवत (चारा) खाण्यासाठी गेलेल्या दोन जनावरांना विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शेतकरी किसन लक्ष्मण कुऱ्हाडे आपल्या सात जनावरांना चारा खाण्यासाठी चरायला घेऊन गेले होते. त्यावेळी मुसळधार पाऊस आणि दाट धुके होते. जनावरे चारा खात असलेल्या जवळच्या ठिकाणी विजेची तार तुटून पडली होती. शेतकरी किसन कुऱ्हाडे यांना तारेमध्ये वीजप्रवाह चालू असल्याबाबत थोडीही कल्पना नव्हती. तुटून पडलेल्या तारेजवळ जनावरे चारा खात होती. अचानक दोन जनावरांना तारेचा शॉक लागून त्या मुक्या जनावरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या जनावरांच्या मागे काही अंतरावरती शेतकरी किसन कुऱ्हाडे असल्यामुळे ते सुदैवाने बचावले आणि मनुष्यहाणी झाली नाही. आपल्यासमोर आपली दोन जनावरे शॉक लागून मरत असल्याचे पाहून किसन कुऱ्हाडे यांनी आरडाओरडा केला व बाकीच्या जनावरांना त्याठिकाणापासून लांब हुसकावून लावले.
मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जनावरांना वाचवण्याचे धाडस कोणीही केले नाही. त्यावेळी त्यांचा मुलगा संदीप कुऱ्हाडे यांनी मोबाईल फोनवरून वायरमन निलेश मेहेर यांना फोन लावून संबधित घटनेची माहिती दिली असता त्यांनी ताबडतोब वीजप्रवाह खंडित केला.त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांमध्ये एक गाभण गाय तर शेतीच्या कामासाठी उपयोगी पडणाऱ्या एका बैलाचा समावेश आहे.
शेतकरी आपले सर्वस्व शेतीसाठी आणि जनावरांसाठी वाहून देतात. एवढे कष्ट करूनही बऱ्याचदा त्यांना नुकसानीला सामोरे जावेच लागते. या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत होते. दोन जनावरांचा मृत्यू झाल्याने किसन कुऱ्हाडे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीच्या गलधान कारभारामुळे नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी किसन कुऱ्हाडे आणि उषा कुऱ्हाडे यांनी केला आहे. या नुकसानीचा पंचनामा महावितरण विभाग आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी करावा. तसेच प्रशासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी किसन कुऱ्हाडे आणि ग्रामस्थांनी केली आहे.