पुणे : पुण्यातील कात्रज जुना बोगदा परिसरात दरड कोसळली आहे. मोठा दगड रस्त्यावर आला होता. त्यामुळे काहीकाळ कात्रज घाटात (Katraj Ghat) वाहतूक खोळंबली होती. याठिकाणी कोंडीही झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्यात आली आहे. मागील सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे (Heavy rain) पावसाळ्याच्या दिवसात दरड पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे रस्यावर दगडे आणि झाडांच्या फांद्या आल्या होत्या. धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे आपत्ती निवारण पथक याठिकाणी दाखल झाले. त्यांच्यातर्फे रस्त्यांवरील दगडे आणि झाडाच्या फांद्या जेसीबीच्या (JCB) सहाय्याने हटविण्यात आल्या, अशी माहिती धनकवडी सहायक आयुक्त विजय वाघमोडे यांनी दिली. या घटनेसह तिसऱ्यांदा ही दरड कोसळली आहे. त्यामुळे हा रस्ता पुढील काही दिवसांसाठी धोकादायक बनला आहे.
डोंगरावरून मोठमोठे चार ते पाच दगड खाली जोरात खाली आले होते. त्यापैकी दोन दगड तर रस्त्याच्या मधोमध पडले होते. सुदैवाने या घटनेत कोणताही अपघात, जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहतुकीचा काही काळासाठी खोळंबा झाला होता. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. तर गेल्या सात ते आठ दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचत आहे, काही ठिकाणी झाडे कोसळत आहेत, तर काही ठिकाणी दरडी.. त्यामुळे घाट रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.
मागील 15 दिवसांत कात्रज घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना घडली आहे.या कात्रज घाट रस्त्याला राज्य विशेष महामार्गाचा दर्जा आहे. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग यांच्याकडे आहे. मात्र, देखभाल दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे कारण सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच अशा घटना वारंवार घडताना दिसून येत आहे. यावर तातडीने उपाययोजना आखाव्या, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.