पुणे : दर्शना पवार हत्याकांडप्रकरणातील आरोपी राहुल हंडोरे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत असून या गुन्ह्यातील अधिकाधिका माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. काल राहुल हंडोरे याची पोलीस कोठडी संपली होती. त्यामुळे त्याची अधिक चौकशी करण्यासाठी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पुणे पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयाकडे केली. न्यायालयानेही या प्रकरणी महत्त्वाची टिप्पणी करून त्याच्या कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे राहुल हंडोरे याच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.
दर्शना पवार हत्या प्रकरणी राहुल हंडोरे याला पुणे पोलिसांनी 21 जून रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने राहुल हंडोरे याला 29 जूनपर्यंत कोठडी सुनावली होती. काल त्याची कोठडी संपल्याने त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी या गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली.
यावेळी कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे कोर्टाने राहुल हांडोरे याच्या पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे आता पोलीस येत्या 3 जुलैपर्यंत राहुलची कसून चौकशी करणार आहे. पोलिसांच्या हाती या चार दिवसात काय लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, दर्शना पवार हत्याकांडानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. प्रेमी युगुल बसण्याच्या ठिकाणी पोलिसांनी लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. प्रेमी युगुलांना सिंहगडावर रात्रीच्या वेळी प्रवेश बंद करण्यात आला आहे. बंदची कडक पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कोंढणपूर इथं तपासणी नाका उभारण्यात आला आहे. तसेच सिंहगड परिसरात रात्रीच्यावेळी वनविभागाचे कर्मचारी गस्त घालणार आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी गडावर येणाऱ्या प्रेमी युगुलांना चाप बसणार आहे.
दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे दोघेही बालपणापासूनचे मित्र होते. दोघेही एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होते. दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करताना राहुल फूड डिलिव्हरी सर्व्हिसमध्ये फूड डिलिव्हरीचं कामही करत होता. दोघेही पुण्यात शिकायला आले होते. राहुलला एमपीएससीच्या परीक्षेत यश आलं नव्हते. तर दर्शनाला पहिल्याच प्रयत्नात यश आलं होतं. ती वन अधिकारी होणार होती.
त्यानंतर राहुलने तिच्याकडे लग्न करण्याचा तगदा लावला. पण दर्शनाने त्याला नकार दिला. त्यामुळे राहुल तिला राजगडावर ट्रेकिंगच्या निमित्ताने घेऊन गेला. तिथेही लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये वाद झाले आणि रागाच्या भरात त्याने दर्शनाची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर राहुल फरार झाला होता. सांगली, पंजाब, दिल्ली, गोवा, पश्चिम बंगाल आणि मुंबईला तो पळून गेला होता. मात्र, तो मुंबईला आल्याचं कळल्यानंतर पोलिसांनी त्याला अंधेरी रेल्वेस्थानकातच पकडलं.