इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) हे गेली सात वर्षे झाले निवांत आहेत, त्यांनी असेच निवांत रहावे, आम्ही केलेल्या विकास कामाचे श्रेय घेऊ नये, इंदापूर तालुक्याचा विकास करणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही, उगाच आम्ही केलेल्या विकास कामांचे श्रेय घेऊ नये, त्यामुळे यांना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे असे राज्यमंत्री भरणे (Datta Bharne) यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Bjp) यांचे नाव न घेता टीका केली, इंदापूर तालुक्यातील कौठळी या गावी विविध कामांचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भरणे बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यात विकास कामाच्या निधीवरून श्रेय वादाची लढाई सुरू आहे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हा वाद सुरू आहे, याच वादाचा धागा पकडत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर सडेतोड टीका केली.
आमच्या कामचे श्रेय लाटू नका
भरणे म्हणाले,”पुणे जिल्हा नियोजन समिती चे अध्यक्ष पालकमंत्री अजित पवार आहेत, त्याचे सदस्य मी स्वतः, सचिन सपकल, वैशाली पाटील हे आम्ही आहोत, एखाद्या सदस्यांनी मागणी केल्यानंतर तो विकास निधीं आम्ही मंजूर करतो. तुमचा काहीच अधिकार नसताना तुम्ही नियोजन मंडळाचे सदस्यही नसताना तुम्ही आमच्या विकास कामाचे श्रेय का लाटता??? असाही प्रश्न यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित करून यांना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे.” असा घणाघाती आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता भरणे यांनी केला.
इंदापुरातल्या वादाला मोठा राजकीय इतिहास
इंदापूरच्या या राजकीय वादाला मोठा इतिहास आहे. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांना कट्टर राजकीय वैरी मानलं जातं. भरणे हे अजित पवारांच्या जवळचे आहेत. त्यामुळे अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना टक्कर देण्यासाठी भरणे यांना तयार केले आहे. गेल्या दोन्ही विधानसभेत इंदापुरात भरणे यांचा बोलबाल राहिला आहे. हर्षवर्धन पाटलांना शह देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. इंदापूरच्या राजकारणात सध्या हर्षवर्धन पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या राजकीय वाधाला वर्चस्वाची धार येत आहे. आगामी काळातही हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.