लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता जवळ येऊ लागल्या आहेत. यामधील काही पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर काही असे उमेदवार ज्यांच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब झालं आहे. यामध्ये बारामती मतदार संघातील लढत ही पवार कुटुंबातच होणार आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार वि. खासदार सुप्रिया सुळे दोन्ही नणंद भावजय एकमेकांना आव्हान देणार आहेत. सुनेत्रा पवार मतदारसंघात भेटी-गाठी घेत आहेत. मंगळवारी भोरमधील भोंगवलीमध्ये सुनेत्रा पवार यांनी भेटीवेळी अजित पवारांवर पक्ष चोरल्याच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी थेट शरद पवार यांनाही सवाल केला.
अनेक वर्षांपासून पवार साहेब सांगत होते व्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला मिळाल पाहिजे, आपण संविधानाच्या गोष्टी सांगतो. लोकशाही आहे म्हणतो. मग जर लोकशाही असेलं आणि अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून बरोबर असणारी 80 टक्के सोबत आली असतील तर पक्ष चोरला किंवा चोरून नेला असं होऊ शकत? आपण लोकशाहीच्या गप्पा मारतो मग लोकशाही नक्की कशाला म्हणायचं? असा सवाल सुनेत्रा पवार यांनी बोलताना केला.
संविधानाने प्रत्येकाला विचार स्वतंत्र्याचा अधिकार दिला आहे..मग अजित पवारांनी त्यांची भूमिका बदलली त्यांचा विचार वेगळा असेलं तर ते चुक कसं असू शकेल. लोकं सुज्ञ आहेत, त्यामुळे नक्की खरं कायं आणि खोट कायं हे लोकांना समजेल. विकास करायचा असेलं तर सरकारमध्ये असण गरजेचं आहे, म्हणून अजित पवारांनी ही भूमिका घेतल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
दरम्यान, बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे यांचा दांडगा जनसंपर्क आहे. मुलीसाठी शरद पवार यांनी कट्टर राजकीय वैरी असलेल्या काँग्रेस नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्याशी हातमिळवणी केली. दोन्ही पवार आमने-सामने आले असताना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आपण निवडणुक लढवणार असल्याचं सांगितलं आहे. महायुती असल्याने शिवतारे अपक्ष निवडणुक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे जर बारामतीमध्ये तिरंगी लढत झाली तर कोण विजयाचा गुलाल उधळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.