बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या आणखीन काही घटना समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या. बंदुका मी घेऊन देईन, असं नानकराम नेभनानी म्हणाले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारने बदलापूरच्या घटनेत काही लपवलं नाही. या घटनेचं राजकारण होतंय. आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जी घटना घडली ती दुःखद होती जे मानवरुपी दानव आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यासाठी मी पण विनंती करणार, शस्त्र वापरणे याच्याविरोधात मी आहे ते कायमच पर्याय असू शकत नाही, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महिलांनी आत्मसंरक्षण केलं पाहिजे. मुलांना स्त्री शक्तीचा आदर करणे शिकवल पाहिजे. लाडक्या बहिण योजनेचा महिलांना फायदा होतोय. खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मी सरकारला फायदा होईल का यावर बोलणार नाही. मात्र प्रगतीचे राजकारण पाहून भाजपला लोक बहुमतात देतील, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या. बंदुका मी घेऊन देईन. दोन-चार लोकांचा जीव गेला तरी चालेल पण वाईट माणूस वाचायला नको, असं नानकराम नेभनानी म्हणाले होते. तर त्यानंतर त्याच मंचावर असलेल्या भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनीही अशाच प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केलं. आधी मला बंदुक द्या. कारण मला बंदुकीची जास्त गरज आहे, असं अनिल बोंडे म्हणाले.