पुणे | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला पुण्यात मोठा झटका बसलाय. नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वसंत तात्या मोरे मनसे सोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर लोकसभा निवडणुका तोंडावर असताना मोरे यांनी पक्षाला हाय व्होल्टेज झटका दिलाय. वसंत मोरे यांनी राजीनामा देऊन काही तास झाले नाहीतर त्यांना अजित पवार गटाकडून ऑफर आली आहे.
वसंत मोरे यांनी पक्षातील अंतर्गत काही नेत्यांवर नाव न घेता टीका केलीय. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा अहवाल हा निगेटीव्ह दाखवल्याचं मोरे यांनी सांगितलं. राजीनामा दिल्यावर आपण दोन दिवसात आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं मोरे म्हणाले आहेत. मात्र त्यांना काही तासातच सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील अजित पवार गटाकडून वसंत मोरे यांना ऑफर करण्यात आली आहे.
वसंत मोरे यांचे पहिलं अभिनंदन, त्यांनी हा योग्य निर्णय आतातरी घेतला. कारण संघटनेमध्ये पक्षामध्ये लोकहितासाठी हातोडा घेऊन जाणारा नेता, त्याला काम करत असताना थांबवण्यासाठी करण्यात येणारे अडथळे या सगळ्या गोष्टी त्यांनी अनेक वर्षे सहन केल्या आहेत. मी म्हणेल हा निर्णय घ्यायला उशिर झाला. लोकांची पसंत मोरे वसंत पण मनसेला नव्हती पसंत म्हणून मला वाटतं त्याने दिलेला राजीनामा योग्य असल्याचं रूपाली पाटील म्हणाल्या.
वसंत भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने इथे तुझं स्वागतच असेल. पण निर्णय तुलाच घ्यायचा असेल. काम करत असणाऱ्या नेत्याला जिथे वाव मिळेल सन्मान मिळतो. तिथे प्रत्येकजण प्रवेश करतो. खूप खूप शुभेच्या भवितव्यासाठी आणि तुझी जी लढाई सुरू आहे ती अशीच सुरू ठेव, असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रूपाली पाटील यासुद्धा आधी मनसेमध्ये होत्या. मात्र त्यांनीही पक्षाला रामराम करत राष्ट्रवादीची वाट पकडली होती. आता रूपाली पाटील यांनी वसंत मोरे यांना आपल्या पक्षात येण्यासाठी ऑफर दिली आहे. आता वसंत मोरे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.