पुणे : पुण्यात 50पेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड (Demolition) करण्यात आल्याची घटना घडली आहे. पर्वती पायथा परिसरात हा प्रकार घडला आहे. 30 ते 35हून अधिक जणांच्या टोळक्याने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. जनता वसाहत (Janata Vasahat Pune) याठिकाणी रात्री दहाच्या सुमारास वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. दुचाकींसह, चारचाकी तसेच ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचीदेखील तोडफोड करण्यात आली आहे. लोखंडी रॉड आणि बांबूने ही ही तोडफोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. पर्वती (Parvati Paytha) पायथा येथील जनता वसाहतीच्या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंना लावण्यात आलेल्या गाड्यांचे या प्रकारामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे रस्त्यावरदेखील सर्व ठिकाणी काचांचे तुकडे दिसून येत आहेत.
वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने वाहनमालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तीस-पस्तीस जणांच्या टोळक्याने हा धुडगूस घालून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेषत: महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. मात्र नेहमीच्या अशा प्रकारांना परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
आधीच्या काही घटना
1. येरवडा परिसरातील वाहनतळ येथे वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. 12 मार्चरोजी हा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी गुंडांनी हे कृत्य केले आहे. या घटनेत एक चारचाकी वाहन, 5 रिक्षा, 5 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. गुंडांनी वाहनावर दगड, पालघनसारख्या हत्याराने काचा फोडल्या होत्या.
2. कल्याणीनगरात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. 31 मार्चरोजी हा प्रकार घडला होता. येथील मुळीक कॉम्प्लेक्समधील एसआरए बिल्डिंगमध्ये ही वाहनांची तोडफोड करण्यात आली. पहाटे पावणेचारच्या सुमारास अज्ञात तरुणांनी पार्किंगमध्ये घुसून तोडफोड केली. यामध्ये चारचाकी, रिक्षा, आपे तसेच दुचाकींची मोठ्या हत्यारांनी तोडफोड करण्यात आली होती. या तोडफोडीच्या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. अज्ञात पाच ते सहा तरूण मुले यात सहभागी असल्याचे स्थानिकांनी सांगितले होते.