पुणे : पुण्यातील 16 वॉर्डांपैकी 11 वॉर्डांमध्ये डेंग्यूचे (Pune dengue) दोन आकडी रुग्ण आढळले आहेत. या वर्षी आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 254वर पोहोचली आहे. सुदैवाने डेंग्यूमुळे शहरात अद्याप एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, हडपसर-मुंढवा, अहमदनगर रोड-वडगावशेरी आणि औंध-बाणेर या प्रभागांमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मात्र, एकट्या ऑगस्ट महिन्यात शहराच्या हद्दीत 49 रुग्ण आढळले. डेंग्यूचे 15 रुग्ण आढळलेल्या कोथरूड प्रभागात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. या वर्षी जुलै महिन्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून 62 रुग्ण या आजारासाठी पॉझिटिव्ह (Positive) आले आहेत. पीएमसीच्या आरोग्य विभागाचे सहायक प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, की ज्या ठिकाणी रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे त्या ठिकाणी फवारणी आणि फॉगिंग सुरू आहे.
रहिवाशांना त्यांच्या सभोवतालच्या आणि आजूबाजूच्या परिसरात डासांची पैदास होऊ देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. फुलांच्या कुंड्यांखाली साचलेले पाणी ही अशाच प्रकारची एक सामान्य जागा आहे, जिथे पावसाळ्यात अनेकदा डासांची पैदास होते, असे डॉ. वावरे म्हणाले. ऑगस्टमध्ये वानवडी-रामटेकडी आणि ढोले पाटील वॉर्डात डेंग्यूचे शून्य रुग्ण आढळले आहेत.
पीएमसीच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती म्हणाले, की शहरात फॉगिंग आणि फवारणी सुरूच आहे. आम्ही 1,705हून अधिक सोसायट्या आणि व्यावसायिक संकुलांना नोटीस बजावली आहे. याठिकाणी डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळली. त्यामुळे त्यांच्याकडून 1,20,800पेक्षा जास्त दंड वसूल केला, असे डॉ. भारती यांनी सांगितले.
फुलदाणी, फ्रिजच्या मागील पाण्याचे ट्रे, कुंड्या, निर्माणाधीन बांधकामे, सरकारी कार्यालये अशा विविध ठिकाणी डेंग्यूचे डास मागील काही काळात आढळून आले आहेत. या सर्वांनादेखील महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे. शहरात एक जानेवारीपासून ते मागील महिनाअखेर (जुलै) या कालावधीत 195पेक्षा अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले. दरम्यान, नोटीस दिल्यानंतरही योग्य ती कार्यवाही न झाल्यास आणि डासांची उत्पत्ती सुरू राहिल्यास संबंधितांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.