पुण्याचं हिट अँड रन प्रकरण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांना फोन केला होता. त्यांनी फोन केला होता की नाही याचा खुलासा करावा. त्यांची नार्को टेस्ट करून राजीनामा घ्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. दमानिया यांचं नार्को टेस्टचं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलं आहे. मी नार्को टेस्टला तयार आहे. माझी नार्को टेस्ट क्लिअर आली तर अंजली दमानिया यांनी पुन्हा मीडियासमोर यायचं नाही. त्यांनी घरात बसायचं. संन्यास घ्यायचा. आहे का तयारी?, असं आव्हानच अजित पवार यांनी दिलं आहे. मीडियाशी संवाद साधताना अजितदादांनी हे आव्हान दिलं आहे.
पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी कोणताही हस्तक्षेप न करता प्रकरण हाताळण्याचं पोलिसांना सांगितलं आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि योग्य तपास करण्याचे आदेशही दिले आहेत. या प्रकरणात ज्या मुलाने अपघात घडवला. तो आतमध्ये आहे. त्याचा बाप आतमध्ये आहे. त्याच्या बापाचा बापही आतमध्ये आहे. कायद्याने आणि नियमाने जी चौकशी व्हायला हवी होती ती सुरू आहे. या प्रकरणात कोणी दोषी असतील… मग त्यात अजित पवार जरी दोषी असला तरी त्याच्यावर कारवाई होईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
पुणे आयुक्तालय परिसरात दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. दारूच्या बाटल्या सापडल्याच्या प्रकरणाचीही चौकशाी होणार आहे. उद्या कुठे दारूच्या बाटल्यांचा खच सापडला तर त्या तुम्हीच टाकल्या असा त्याचा अर्त होतो का? असा उलटा सवालही अजितदादांनी विचारला.
अपघात प्रकरणातील लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. त्याचप्रमाणे दारूच्या बाटल्यांचा खच ज्या ठिकाणी सापडला किंवा पाहायला मिळाला त्यात जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल. कशा बाटल्या आल्या? कोणी आणल्या? त्याचा टॅक्स भरला गेलाय का? एक्ससाइजचं त्याच्याबद्दल काय मत आहे? या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल. त्या डुबलीकेट आहेत का ओरिजनल आहेत? या सगळ्या गोष्टी तपासायच्या असतात, असंही ते म्हणाले.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृती दहन करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. या संदर्भात मला काहीही माहिती नाही. या संदर्भात माहिती घेतो. देशामधील जे महापुरुष आहेत, त्या महापुरुषांबद्दल प्रत्येकाला आदर असतो. त्यांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे. त्यातून कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत त्याबद्दलची काळजी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.