पिंपरी-चिंचवड | 20 जानेवारी 2024 : नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूरला पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांचे वाटप झाले. याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड नगरीत गृहप्रकल्प उभारण्याची योजना आहे. पिंपरी-चिंचवड ही कष्टकरी, कामगारांची नगरी आहे. त्यामुळे कामगार वर्गाचे घरांचे स्वप्न पूर्ण होईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका कार्यक्रमात भाषण करताना सांगितले. ज्या विकासकांनी पुनर्वसन प्रकल्प रखडवले आहेत, त्यांना नोटीस देऊन त्यांचे प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण करायला हवेत अशाही सूचना पवार यांनी यावेळी दिल्या.
पिंपरी आणि आकुर्डी येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्ग पालीकेने उभारलेल्या गृहप्रकल्पाचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी चिंचवड येथे अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी संगणकीय लॉटरी सोडत झाली. त्यावेळी अजित पवार यांनी भाषण केले. गरिबांना घर मिळतात तर तुमच्या काय पोटात दुखतं, कोण तरी उठतात पीआयएल दाखल करतात आणि त्यात अडचणी निर्माण होतात. गरिबांना घर मिळण्यास अडचणी येतात असेही अजित पवार यांनी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान आवास योजनेत काहींचं नशीब उजळेल. मात्र काहींना घरं मिळणार नाहीत. त्यामुळं नाउमेद होऊ नका. तर ज्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल, म्हणून अगदीच भारावून जाऊ नका. पैसे वाचले म्हणून ते उधळू नका. नाहीतर चौफुला, टेम्भुर्णीला जाल आणि तिथं उधळपट्टी कराल. असं काही करू नका असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना केले.
बाबांनो माझी तुम्हाला विनंती आहे, एक किंवा दोन अपत्यावर थांबा. मी इथला खासदार असताना असलेली लोकसंख्या आणि आता असलेली लोकसंख्या ही तुलनेने खुपचं वाढलेली आहे. लोकसंख्या अशीच जर वाढत गेली ना, तर मग अगदी ब्रह्मदेव आला तरी सर्वांना घरं बांधून देऊ शकणार नाही असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
पंतप्रधान आवास योजनेची सोडत ही पारदर्शक आहे. तुम्ही अगदी माझ्याकडे आले अन म्हणाले दादा माझी चिठ्ठी काढा तर ते मला ही जमणार नाही. मलाच काय तर कोणाच्याच हातात हे नाही. नाहीतर काही शहाणे असतात, जे म्हणतात मी घर मिळवून देतो. असले कोणतेही एजंट प्रशासनाने नेमलेले नसतात. अगदी कोणाचे पीए असतील त्यांच्यावरही विश्वास ठेवू नका. नाहीतर ‘दस का बिस’ चे प्रकार घडतात. आता नशिबाने तुमचा नंबर लागणार आणि हे शहाणे म्हणतात बघा माझ्यामुळंच तुमचं स्वप्न पूर्ण झालं. अस म्हणून ते पैशांची लुबाडणूक करतात. ह्या अशा शहाण्यांना मी सरळ करणार आहे. आता यांना मी साल्या म्हणणार होतो, पण शहाण्यांना म्हणतो आता. कारण साल्या म्हणणं बरं वाटत नाही असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले