अभिजीत पोटे, पुणे : पुण्यात सध्या पोस्टरवॉर रंगले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आताचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पोस्टरवरून पुण्यात राजकीय चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पुण्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चढावोढ सुरू झाली असल्याचे चित्र दिसत आहे. 22 जुलै रोजी या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचे बॅनर (Banner) आता शहरभर लागले आहेत. मात्र पुण्यात अलका चौकात लावलेल्या शुभेच्छांच्या बॅनरची चर्चा दोन्ही गटात होताना दिसत आहे. अगदी समोरासमोर लावण्यात आलेल्या या बॅनरनंतर आता राजकीय क्षेत्रासह पुण्यात चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
पुण्यातील विविध ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र अलका चौकातील बॅनर काही वेगळाच आहे. शुभेच्छा देताना राष्ट्रवादीने भाजपाला डिवचले आहे. दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी समोरासमोरच बॅनर लावण्यात आले आहेत. बैठका होतील… ताफा दिसेल… पण अशी धडाडी तिथे नसेल… एकच पालक अजित पवार, अशा आशयाचा मजकूर अलका चौकातील बॅनरवर छापण्यात आला आहे. या माध्यमातून राष्ट्रवादीने भाजपाला डिवचले आहे. सत्तांतर झाल्यानंतर पुण्याचा पालकमंत्री कोण, अशी चर्चा होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे येत होते. मात्र या बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादीने भाजपाला लक्ष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस समर्थक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी या बॅनरसमोरच फडणवीसांना शुभेच्छा देणारा बॅनर लावला आहे. निष्कलंक नेतृत्व, निर्विवाद कर्तृत्व असे लिहित उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षा पुणेकर जाणून आहेत. मेट्रोचा विषय असो, वा शहरातील इतर प्रश्न… अजित पवारांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आणि राष्ट्रवादीकडून त्याला तसेच प्रत्युत्तर हे समीकरणच बनले आहे. या बॅनरबाजीवर वाढदिवस असणाऱ्या या दोन नेत्यांची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.