पुणे : शिवसेनेत एकीकडे फाटाफूट सुरू असून दुसरीकडे भाजपात मात्र आनंदाचे वातावरण आहे. आपला मुख्यमंत्री होणार असल्याचे वेध भाजपाला लागले आहेत. त्याचाच परिणाम पुण्यातही दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी पुण्यात पाहायला मिळत आहे. यंदाची आषाढीची पंढरपुरातली पूजा देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते व्हावी, असे त्यात म्हटले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्याने सध्या महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. अजून निश्चित आकडेवारी समोर आलेली नसली तरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 45हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. तसे झाले तर महाविकास आघाडीचे बहुमत अल्पमतात रुपांतरीत होईल. त्यामुळे भाजपाला (BJP) संधी असून आता पुढील रणनीती आखली जात आहे.
सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे मुक्कामी आहे. येथून पंढरपूरकडे पालखीसह वारकरी प्रयाण करतील. दुसरीकडे राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच यावेत, यासाठी कार्यकर्त्यांनीदेखील पोस्टरबाजी सुरू केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या शिवाजीनगर विभागातील भाजपाचे पदाधिकारी प्रकाश सोलंकी आणि रवींद्र साळेगावर यांनी ही पोस्टर्स लावली आहेत. ‘हे माऊली, तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे. तुझ्या पंढरपूरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येवू दे!’ असे पोस्टरवर छापण्यात आले आहे.
मागील अडीच वर्षांपासून जो राज्यात अधर्म सुरू होता, त्याला लाथाडण्याची वेळ आली आहे. यावर्षीची आषाढीची पूजा अधर्म केलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार नाही. महाराष्ट्रात रामराज्याची स्थापना होईल आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आषाढीची पूजा करतील, हा ईश्वरी संकेत आहे, असे भाजपा अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले काल म्हणाले होते. 24 तासांत सर्वकाही आलबेल होईल आणि अधर्माचे सरकार कोसळेल, असेही ते म्हणाले होते.