पुणे : पुण्यातील महाराष्ट्र केसरीच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, पोलिसांची (Police) क्राईम काँफरन्स झाली. पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड आयुक्त, पुणे ग्रामीण यांना एक गोष्टी स्पष्टपणे सांगितली आहे. उद्योगांना (Industry) त्रास देणाऱ्यांवर कारवाई करा. मग, तो कुठल्या गटाचा आहे. कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा आहे. कुठल्या धर्माचा आहे, याचा काहीही विचार करायचा नाही. उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करा. त्यांच्या मुसक्या बांधा. त्यांना जेलमध्ये टाका, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.
आपल्याकडे गुंतवणूकदार यायला तयार आहेत. ब्लॅकमेलर्सची इको सिस्टीम तयार झाली आहे. हे ब्लॅकमेलर्स उद्योजकांना त्रास देत आहेत. हे ब्लॅकमेलर्स मोठ्या प्रमाणात वसुली करतात. लायसन्स नसलेले फेक माथाड्यांच्या नावानं वसुली करतात, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
काही लोकं आम्हालाचं कंत्राट द्या. आम्ही सांगू त्या रेटला द्या. आम्ही काम करणार नाही. ते काम दुसऱ्याला देऊ. ही जी मानसिकता तयार झाली आहे त्यांचं कंबरडं मोडून काढण्याचं काम येत्या काळात करायचं असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना सांगितलं.
एक गुंतवणूकदार मला भेटले. त्यांनी सांगितलं की, वर्षभरापूर्वी सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करायचं ठरविलं होतं. पण, आम्हाला धमक्या मिळाल्या. वसुलीचे संदेश मिळाले. त्यानंतर ती सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कर्नाटकात घेऊन गेलो. हे होत असेल, तर आपल्या युवकांच्या हाताला काम मिळणार नाही.
उद्योगांना त्रास देणारी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. यासंदर्भात अतिशय कडक मेसेज पोलिसांना दिलाय. पोलीस जर कारवाई करणार नसतील, तर त्या पोलिसांना कारवाईला सामोरं जावं लागेल. असा कडक संदेश या निमित्तानं दिला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.