राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. मनोज जरांगेंकडून करण्यात आलेल्या आरोपांना फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे जर म्हणाले की मी मराठा आरक्षण देण्यात अडथळा आणतो आहे, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि राजकारणातून निवृत्ती घेतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक झाली. पुणे जिल्ह्यातील दौंडच्या विविध प्रकल्प आणि योजनांसंबंधी बैठक झाली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.
मला याची कल्पना आहे की, मनोज जरांगे पाटील यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सगळे मंत्री हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर काम करत असतात. एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करतो. त्यामुळे मी त्याच्या पुढे जाऊन सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे यांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे यांना विचारावीत, असं फडणवीस म्हणाले.
जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं की, मराठा आरक्षणासंदर्भात कुठलाही निर्णय घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी मी माझ्या पदाचाही राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं की, मराठा आरक्षणासंदर्भात कुठलाही निर्णय घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी मी माझ्या पदाचाही राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यांना पश्चाताप झालाय. तुम्ही राज्याचे कर्ते आहात. तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण रोखलं आहे हे सत्य आहे, तुम्ही ते आरक्षण द्या ना… सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही रोखली आहे. ते तुम्ही नाकारून चालणार नाही, असं मनोज जरांगे म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याबाबत विधान केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. त्यांना मराठा विरोधी म्हणणं चूक आहे, असं ते म्हणाले.