पुणे : सर्वोच्च न्यायालयाने अखेर बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा एकदा राज्यभर गावागावात बैलगाडा स्पर्धा होणार आहे. तब्बल 12 वर्ष सर्वोच्च न्यायालयात संघर्ष केल्यानंतर कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बैलगाडा शर्यतीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोर्टाने दिलेल्या या निर्णयाने आनंद झाला, असं फडणवीस म्हणाले. तसेच बैल हा धावणारा प्राणी आहे, असा रिपोर्ट आम्ही दिला होता. तसा युक्तिवाद कोर्टात केला होता. त्यामुळेच कोर्टाने हा निर्णय दिल्याचं फडणवीस म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी उठवल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. कोर्टाच्या निर्णयाने आनंद होत आहे. मी मुख्यमंत्री असतना बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी कायदा केला होता. त्यानंतर राज्यात बैलगाडा शर्यत सुरू झाली होती. शर्यतीला विरोध करणाऱ्यांनी बैल हा धावाणारा प्राणी नाही असा युक्तिवाद केला होता. त्यामुळे आपण नव्याने कायदा केला. त्यामुळे पुन्हा कायद्याला स्थगिती मिळाली. त्यानंतर आम्ही एक समिती तयार करून एक सायंटिफिक रिपोर्ट तयार केला. रनिंग अबिलिटी ऑफ बुल… बैल हा धावणारा प्राणी आहे, असा रिपोर्ट आम्ही तयार केला. हा रिपोर्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सादर केला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या प्रकरणावर ज्यावेळी सुनावणी सुरू झाली तेव्हा आम्ही सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांना महाराष्ट्राची बाजू मांडण्याची विनंती केली होती. बैल हा धावणारा प्राणी आहे. रनिंग अबिलिटी ऑफ बुल आहे, असं सांगत आमचा रिपोर्ट त्यांना देऊन हा रिपोर्ट कोर्टात सादर करून त्यावर युक्तिवाद करण्याची विनंती मेहता यांना केली होती. हा कायदा आहे. कारण या कायद्यामध्ये सगळ्या प्रिकॉशन घेतलेल्या आहेत. प्राण्यावर अन्याय होणार नाही याची काळजीही यात घेण्यात आली आहे, असं आम्ही मेहता यांच्या निदर्शनास आणू दिले होते, असं ते म्हणाले.
मला अतिशय आनंद आहे की, आज जो निर्णय आला आहे त्याच्यामध्ये आम्ही केलेला कायदा हा सर्वर्थाने संवैधानिक आहे. तसा निकालच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. हा शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे. महाराष्ट्राचा मोठा विजय आहे. विशेषत इथले अनेक लोक या प्रकरणात पाठपुरावा करत होते.
विशेषत: महेशदादा लांडगे असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील किंवा बाळा भेगडे असतील राहुल कुल असतील या सगळ्यांनी प्रचंड पाठपुरावा केला आहे. जी काही मेहनत आम्ही केली आज ती खऱ्या अर्थाने सफल झाली आहे. आमचा कायदा आणि आम्ही केलेला रिपोर्ट या दोन्ही गोष्टी सुप्रीम कोर्टाने व्हॅलिड ठरवली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणा याचं प्रत्यार्पण होणार आहे. त्यावरही त्यांनी आनंद व्यक्त केला. राणा यांच्या प्रत्यार्पणानंतर मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता हे जगजाहीर होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरवण्यासाठी किंवा त्याच्यावर वेगवेगळ्या युनायटेड नेशन्सच्या स्टेट्सप्रमाणे बंधन घालण्याकरता प्रचंड मोठा फायदा आपल्याला होणार आहे. मागच्या काळामध्ये आपण डेव्हिड हेडलीची जी साक्ष आपण घेतली, त्या साक्षीमुळे खऱ्या अर्थानं हा मार्ग खुला झालेला आहे, असंही त्यांनी सांगितलं.