शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी आढळराव पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक आमदार दिलीप मोहिते पाटील हे देखील मंचावर उपस्थित होते. दिलीप मोहिते पाटील यांनी आज शिवाजी आढळराव पाटील यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केलं. पण याचवेळी त्यांनी शिवाजी आढळराव पाटील यांना मोठा इशारादेखील दिला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते मंचावर उपस्थित होते. या सर्वांसमोर दिलीप मोहिते पाटील यांनी आढळराव पाटील यांना इशारा दिला. दुसरीकडे शिवाजी आढळराव पाटील यांनी आपल्या भाषणात दिलीप मोहिते पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
“मलाही शिवसेनेतून राष्ट्रवादीत अजित दादांनी आणलं. घडाळ्याच्या चिन्हावर मी कसा उभा राहिलो? याची ही एक मोठी कथा आहे. हे सांगायला कोना ज्योतिषाची गरज नाही. माझं दिलीप वळसे आणि शिवाजी आढळरावांशी कोणतं ही वैयक्तिक वैर नाही. भामा आसखेड आणि कळंबोली धरणातील पाणी माझ्या तालुक्याला मिळावं, यासाठी माझा त्यांच्याशी संघर्ष सुरू होता. बोलल्याशिवाय काही मिळत नाही. मी बोलत होतो, त्यामुळे मतभेद दिसून आले. मात्र आता दिलीप वळसे आणि अजित दादांनी पाणी देतो, हे कबूल केलेलं आहे. इतकीच माझी भूमिका होती. आता माझा प्रश्न सुटला त्यामुळं हा पुढचा (लोकसभेचा) प्रश्न ही सुटणार आहे”, असं दिलीप मोहिते पाटील म्हणाले.
“मी ही तापट आणि शिवाजी आढळराव हे देखील तापट. त्यामुळे दोन सारख्या स्वभावाची माणसं एकत्र आली की पटत नाही. त्यामुळे गेली 20 वर्षे शिवाजी आढळरावांशी संघर्ष होता. दोघेही शिवसेनेत होतो. त्यामुळे माघार घ्यायची कोणाची तयारी नव्हती. आता आमचं मिटलं आहे. पण माझ्या तालुक्यात आढळरावांनी इतका संघर्ष का केला? याचं उत्तर अद्यापही मला आढळरावांनी दिलेलं नाही”, अशी खंत दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केली.
“अजित दादा हे एकमेव असे नेते आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात एक नंबर बनवतील. हे आधीच व्हायला हवं होतं. पण उशीर झाला. आता अजित दादांनी मला ताकद दिली, तशीच ताकद शिवाजी दादा तुम्ही पण द्या. नाहीतर मोहिते गट, आढळराव गट, वळसे गट अशा चर्चा रंगायच्या. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. शिवाजी दादा फक्त तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही, मात्र गैरविश्वास दाखवला तर दिलीप मोहिते नाव सांगणार नाही, हेही लक्षात ठेवा”, असा इशारा दिलीप मोहिते पाटील यांनी दिला.