मंचर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून अल्टिमेटम दिला आहे. मात्र, या अल्टिमेटमवरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांना सुनावले आहे. भोंग्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घ्यायचा नाही, अशा शब्दात दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी सुनावलं आहे. राज ठाकरे यांनी कालच्या सभेत केवळ शरद पवारांवर (sharad pawar) टीका केली. त्यांच्याकडे काही काम नाही. त्यांनी साधी बालवाडीही चालवली नाही. समाजासमाजात द्वेष निर्माण करणारं त्यांनी काम केलं. भावना भडकवण्याचं काम केलं. पोलीस त्यांचा संपूर्ण व्हिडीओ ऐकतील. आक्षेपार्ह काय आहे, काय नाही यावर निर्णय घेतील. त्यानंतर पोलिसांचा अहवाला आल्यावर कारवाई केली जाईल, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातीयवादाचा आरोप केला होता. त्यावरही दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरेंनी असे आरोप केले म्हणजे पवार साहेबांवर परिणाम होणार नाही. त्यांचं राजकीय आणि सार्वजनिक जीवन देशाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे. पवारांनी समाजाला एकत्र ठेवण्याचं काम केलं आहे. विकासाचं काम केलं आहे. हजारो महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातून महाराष्ट्रात समृद्धी आली आहे. ज्यांच्याकडे काहीच कार्यक्रम नसतो ते असा आरोप करत असतात, अशी टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली.
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पवार नास्तिक असल्याचा पुनरुच्चार केला. त्यावरही वळसे पाटील यांनी भाष्य केलं. दुसरं काही सांगायला नसलं तर असले मुद्दे काढले जातात. एखाद्याचं अस्तिक असणं आणि नसणं त्यात काय फरक पडतो. प्रत्येकला आपला धर्म जात आणि धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. पवार नास्तिक आहेत हा मुद्दा होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.
राज यांनी देशातील बेरोजगारीवर बोलायला हवं होतं. उन्हाळ्यात हाल होणार त्यावर बोलायला हवं होतं. इंधन दरवाढीवर बोलायला हवं होतं. त्यांचं भाषण पवार आणि भोंगे या दोन विषयाच्या पलिकडे गेले नाही. त्यांच्याकडे कृती कार्यक्रम नाही. त्यांनी साधी बालवाडी चालवली नाही. केवळ भाषण करणं आणि समाजासमाजात तेढ निर्माण करणं यापलिकडे त्यांच्याकडे काही कार्यक्रम नाही. पवार साहेब नास्तिक आहेत की नाही त्याचं ते प्रदर्शन करत नाही. पवार साहेब भीमाशंकरला मुख्यमंत्री असल्यापासून अनेकदा आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांच्या सभेत अटी आणि शर्तीचं पालन झालं नसेल तर कारवाई करणार का? असा सवाल दिलीप वळसे पाटील यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. या संदर्भात औरंगाबादचे पोलीस आयुक्त हे व्हिडीओ बघतील. अटी शर्तीचं कुठे उल्लंघन झालं ते पाहतील. त्याचा अहवाल तयार करतील आणि मग तो वरिष्ठांना पाठवतील. त्यानंतर वरिष्ठ निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं.
मी उद्या मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तोपर्यंत औरंगाबादचा रिपोर्ट येईल. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. राज्यातील नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी शातंता आणि सलोखा ठेवावा. कुणी कितीही तापवातापवीचं काम केलं, पेटवापेटवीचं काम केलं तरी त्याला साथ देऊ नये. सरकार निश्चितप्रकारे योग्य तो निर्णय करेल, असंही ते म्हणाले.