पहाटे पहाटेच ईडीची छापेमारी, 9 ठिकाणच्या झाडाझडतीने पुणे हादरले; थेट मुश्रीफ यांच्याशी कनेक्शन

| Updated on: Apr 03, 2023 | 9:35 AM

पुण्यात ईडीने नऊ ठिकाणी छापेमारी केली आहे. पहाटेपासूनच ही छापेमारी सुरू आहे. हे व्यावसायिक हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही छापेमारी सुरू आहे.

पहाटे पहाटेच ईडीची छापेमारी, 9 ठिकाणच्या झाडाझडतीने पुणे हादरले; थेट मुश्रीफ यांच्याशी कनेक्शन
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी आहे. पुण्यात आज सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली आहे. पुण्यातील 9 बड्या व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरू केली आहे. यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी सकाळीच ईडीने शहरातील बड्या व्यावसायिकांवर छापेमारी सुरू केल्याने पुणे शहर हादरून गेलं आहे. विशेष म्हणजे या व्यावसायिकांवर छापेमारी करण्याचं कनेक्शन थेट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी असल्याचं सांगितलं जात आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळीच पुण्यातील 9 व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी सुरू करून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. सिंहगड रोड आणि शिवाजी नगर परिसरात हे व्यावसायिक राहतात. तिथेच त्यांचे कार्यालयही आहे. या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली. ज्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली, तिथे सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही आत सोडण्यात येत नाहीये. तसेच आतील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय या व्यावसायिकांच्या कुटुंबातील लोकांना कुणालाही फोन करण्यास मज्जाव करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

या व्यावसायिकांवर धाडी

विवेक गव्हाणे, चंद्रकांत गायकवाड, जयेश दुधेडिया या व्यवसायिकांच्या घर आणि कार्यालयात ईडीने छापेमारी केल्याचं कळतं. त्यामुळे या छापेमारीकडे संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, काल पिंपरी-चिंचवडमध्ये ईडीने छापेमारी केली होती. सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे 124 बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास 430 कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले होते. या प्रकरणी छापेमारी करण्यात आली होती.

धोक्याची घंटा

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कथित साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. मुश्रीफ यांच्याशी संबंधित जे व्यावसायिक आहेत, त्यांच्याच घर आणि कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं मानलं जात आहे.

जनतेने विश्वास दाखवला

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या छापेमारीवर भाष्य केलं होतं. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या इतिहासात सर्वात जास्त नफा यावर्षी झाला आहे. झालेल्या आर्थिक वर्षात बँकेला 203 कोटीचा नफा झाला आहे. बँकांमध्ये ठेवी ठेवण्याचं लोकांचं प्रमाण कमी झाले ही चिंतेची बाब आहे. ठेवीदारांना विनंती आहे की, कोणत्याही बँकेत ठेवी ठेवा. पण वाढीव पैशाच्या हव्यासापोटी फसवणूक करू घेऊ नका. चेन मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवू नका. ईडीचा छापा पडल्यानंतर देखील ठेवीदारांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर विश्वास ठेवला. गेली दोन ते अडीच महिने अनेक अफवा पसरल्या होत्या. बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. पण ठेवीदार, बँकेचे कर्मचारी यांनी विश्वास दाखवला त्यांचे आभार, असं हसन मुश्रीफ म्हणाले होते.