पुणे | 5 ऑगस्ट 2023 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज संध्याकाळी पुण्यात दाखल झाले आहेत. अमित शाह यांचा उद्या पिंपरी चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित शाह पुण्यात आले आहेत. अमित शाह यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर राहणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पुण्यात आहेत. विशेष म्हणजे सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील जे डब्लू मेरीट हॉटेल येथे महत्त्वाची खलबतं होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे डब्लू मेरीट हॉटेल येथे दाखल झाले आहेत. ते दाखल झाल्यानंतर अमित शाह देखील हॉटेलमध्ये आले. या तीनही नेत्यांमध्ये रात्री अकरा वाजेपासून चर्चा सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्तारापासून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांवर वारंवार निशाणा साधला जातोय. गेल्या महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं वाटत होतं. पण त्यावेळी अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होत नवा राजकीय भूकंप घडवून आणला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांसाठी खातेवाटप करण्यात आलं. त्यावेळी सत्ताधारी शिंदे गटात धुसफूस सुरु असल्याची चर्चा समोर आली होती.
विशेष म्हणजे नव्या मंत्र्यांसाठी तत्कालीन मंत्र्यांच्या हातातील खाती काढून घेण्यात आली होती. त्यांना दुसरी खाती देण्यात आली होती. खात्यांमध्ये आदलाबदल करण्यात आले होते. पण मंत्रिमंडळाचा विस्तार त्यावेळी झाला नव्हता. राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदारांची नाराजी ओढावू नये, यासाठी ते पाऊल उचलण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आता पावसाळी अधिवेशन संपताच घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे अमित शाह, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या आजच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.