पुणे : भेटायला माझ्याकडेच वेळ होता. मात्र मला वाटत नाही बाकी कुणाकडे भेटायला वेळ होता, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. ते पुण्यात बोलत होते. शिवसेनेतील बंडखोरांच्या मतदारसंघात सध्या एकनाथ शिंदेंचे दौरे सुरू आहेत. आज ते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या मतदारसंघात होते. यावेळी त्यांनी बंडखोरीची कारणे सांगत पुन्हा एकदा ठाकरेंवर टीका केली. मला जेवढे जेवढे शक्य होते, ती मदत मी करत होतो. आमच्याकडे मंत्री पद असताना आम्ही पायउतार झालो. मला निवडून यायला कुठलीही निशाणी लागत नाही, एवढे काम मी माझ्या मतदारसंघात केले आहे, असा दावादेखील यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला. असेच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहिलो असतो, तर यातील एकही आमदार निवडून आला नसता, असे वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.
उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर त्यांनी यावेळी टीका केली. शिवसैनिकांना या अडीच वर्षात काय मिळाले, तडीपारी कारवाई करण्यात आली. अडीच वर्षात आम्हाला कुणी विचारले नाही. सामान्य शिवसैनिकांची एक भावना होती, काँग्रेस-राष्ट्रवादीशी फारकत करण्याची मात्र आम्हाल उघड्या डोळ्यांनी हे पाहत बसावे लागत होते. नगरपंचायतीच्या निवडणुकीत सेना चार नंबरवर फेकली गेली. मात्र सेना भाजपाच सरकार आले असते, तर आज काँग्रेस-राष्ट्रवादी कुठे राहिली असती, औषधालाही उरली नसती, असा टोला त्यांनी लगावला.
थोडे जरी मागे पुढे झाले असते तर आमचा कार्यक्रमच झाला असता, असे सांगत काही लोकांना वाटले होते या लोकांनी राजकीय आत्महत्या केली आहे. दीपक केसरकर नावाचा संत माणूस भेटला. अगोदर तो माणूस अडगळीत होता. तुम्ही तो शोधून काढला. आम्ही गद्दार बंडखोर असतो तर तुम्ही एवढ्या उन्हात आला असता का, असा सवाल त्यांनी केला. आम्ही घेतलेली भूमिका बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी आहे, असे शिंदे म्हणाले.
ज्या शिवसैनिकांनी अडीच वर्षे त्रास भोगला आहे, एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लावला जाणार नाही. राज्याला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आणायला पाहिजे होते, ते आम्ही केले. मग विश्वासघात कुणी केला, आम्ही केला का, हे जनता ठरवेल, असे शिंदे म्हणाले.
गुंजवणीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 50 कोटी दिले जाणार, उरुळी पाणी पुरवठा योजनेसाठी 25 कोटी रुपये दिले जाणार, दिव्यात बाजार समितीसाठी ज्या अडचणी असतील त्या दूर केल्या जातील, कुठलाही प्रकल्प तुमच्या संमत्तीने घेतला जाईल, विमानतळ हे दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आमचे सरकार आल्यावर ते थांबले आहे. एकनाथ शिंदे तुमच्या हक्काचा माणूस आहे, असे यावेळी शिंदेंनी म्हटले आहे.