पुणे : मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांची सदिच्छा भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. मुक्ता टिळक यांच्या मतदारसंघातील 40 ते 50 वर्षांच्या इमारती आहेत, पुनर्विकासाची कामे अडकली आहेत. याचबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना केल्या, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात आहेत. विविध गणेश मंडळांना भेटी देऊन गणपती बाप्पाचे दर्शन ते घेत आहेत. यावेळी केसरीवाडा गणपतीचे (Kesari Wada Ganpati) दर्शन त्यांनी केले. येथे वास्तव्यास असलेल्या भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या प्रकृतीची विचारपूसही त्यांनी केली आहे. मुक्ता टिळक या कर्करोगाशी सध्या झुंज देत आहेत. राज्यसभा तसेच विधानपरिषद निवडणुकीवेळी मतदान करण्यासाठीदेखील त्या रुग्णवाहिकेने विधान भवनात पोहोचल्या होत्या.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की आज मी पुण्यातील गणपती बापाचे दर्शन घ्यायला आलो आहे. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. समाधान दिसत आहे. गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता येत असल्याबद्दल भक्तांमध्ये मला आनंद दिसला. गणेशोत्सवाचे सर्व निर्बंध आम्ही काढले. नियम पाळून सर्वजण धुमधडाक्याने सण साजरे करत आहेत. यावेळी राज्यावरचे संकट दूर करून शेतकरी, सामान्य जनतेला सुखी ठेवण्याचे साकडे गणरायाकडे घातल्याचे शिंदे म्हणाले. दगडूशेठ गणपतीसह मानाच्या गणपतींचे दर्शन तसेच आरती त्यांनी केली. मोठ्या गणेशभक्तांची मोठी गर्दी सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे.
मुक्त टिळक यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर ते म्हणाले, की मुक्त टिळक सध्या कर्करोगावर उपचार घेत आहेत. मात्र हे करत असताना त्यांची कामाप्रती तळमळ पाहत आहे. या मतदारसंघात अनेक जुन्या इमारती आहेत. त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. यासंदर्भात तातडीने गगराणी साहेबांशी बोललो आणि सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना केल्या, असे ते म्हणाले. केसरीवाडा याठिकाणी आल्याने येथील इतिहास मला पाहता आला. इतिहासाची जपणूक चांगल्या प्रकारे केल्याचे यावेळी शिंदे म्हणाले.