पुणे : अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. आज राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सोबत ९ मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी आपण हा निर्णय राज्याच्या जनतेच्या हितासाठी घेतला असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहे. केंद्राच्या मदतीने राज्याचा विकास करू, असं आश्वासन दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हही माझ्यासोबत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
त्यानंतर लगेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ८० टक्के आमदार परत येतील, असा विश्वास व्यक्त केला. शिवाय जे गेले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नसल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रदोतपदीही जितेंद्र आव्हाड राहणार आहेत. जयंत पाटील हे सकाळपासून मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात असल्याचंही शरद पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी बंड केल्याचा सुतोवाच शरद पवार यांनी केला. न्यायालयीन लढाई आपण लढणार नाही. तर लोकांमध्येच आपण जाणार. असंदेखील शरद पवार यांनी म्हंटलं. पेपर फुटला असंदेखील आपल्याला वाटत नाही, असा महत्त्वाचा मुद्दादेखील शरद पवार यांनी मांडला. ईडीचा टांगती तलवार असल्यामुळे काही नेते गेले असावेत, असंही शरद पवार यांनी म्हंटलं.
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. त्यानंतर ज्या नेत्यांवर आरोप केले ते सरकारमध्ये गेलेत. त्यांच्यावरचे आरोप धुतले गेले, असंही शरद पवार म्हणाले.
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर मी विश्वास ठेवला होता. त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली होती. मात्र, आता तटकरे आणि पटेल यांच्यावर आपला विश्वास उरला नाही, असंदेखील शरद पवार म्हणाले.