बारामती, पुणे : राजकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीत (Baramati) एक आगळावेगळा उपक्रम आज पार पडला, तो म्हणजे मातीतल्या खेळांच्या जत्रेचा… या जत्रेत आबालवृद्धांनी सहभाग घेत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर अशा खेळांपासून अनभिज्ञ असलेल्या चिमुरड्यांनी या खेळांची माहिती घेत त्याचा मनमुराद आनंद लुटला. एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया (Environmental Forum of India) या सेवाभावी संस्थेच्या वतीने पर्यावरण चळवळीला अधिक गती देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुनेत्रा पवार यादेखील यामध्ये सहभागी झाल्या. या अंतर्गत विटीदांडू, गोट्या, लगोरी, टायर पळविणे, भोवरा अशा विविध खेळांचा (Games) समावेश असलेली मातीतील खेळांची जत्रा हा आगळावेगळा उपक्रम बारामतीतील शारदा प्रांगणात पार पडला. चिमुरड्यांसह मोठी मंडळीही यात उत्साहाने सहभागी झालेली दिसून आली.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमात विटी दांडू, भोवरा, पोत्यातील शर्यत, टायर पळवणे अशा खेळांचा आनंद मुलांनी लुटला. तर महिला जिबल्या, फुगड्या, डान्स, तळ्यात मळ्यात आणि गजग्यांचा खेळ खेळताना दिसत होत्या. कॉम्प्युटर, व्हिडिओ गेम, टीव्हीच्या या खेळांमध्ये दंग झालेली आजची पिढी मातीतले खेळच विसरली आहे. त्यामुळे मातीची नाळ कमी होत चालली आहे. त्यांचा व्यायाम खुंटल्याने शारीरिक क्षमता कमी होत चालली आहे. त्यांच्यामध्ये मातीतल्या खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, त्याचप्रमाणे मोठ्यांना जुने खेळ खेळण्याची संधी मिळावी म्हणून एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया वतीने रविवारी मातीतल्या खेळांची जत्रा आयोजित केली होती.
या निमित्ताने जुने खेळ खेळण्याची संधी मिळाल्याने कधी एकदा या साधनांना हात लावू, असे अनेकांना झाले होते. आवडीचा खेळ ताब्यात घेण्यात व आपण मित्रांना कसे वरचढ होत होतो. नव्या पिढीला जुन्या खेळांविषयी माहिती व्हावी, म्हणून अनोख्या उपक्रमांचे आयोजन केले होते. आपल्या मुलांना त्याची माहिती व्हावी म्हणून असंख्य पालक, आजी-आजोबा मुलं, नातवंडांना घेऊन आले होते. यामध्ये महिलांची संख्याही मोठी होती. पण तेथे आल्यावर बालपणीचे खेळ पाहिल्यानंतर मोठ्यांनीच मनसोक्त खेळून रविवारची सुटी सत्कारणी लावली.