पुणे : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, हा व्हिडीओ उत्साहानं किंवा आनंदानं करत नाही. पण, गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात जे अनुभवतोय. पाहतोय. त्यावर व्यक्त व्हावसं वाटतं. काल याच विषयावर संसदेतसुद्धा आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. आज पुन्हा एक घटना घडली. म्हणून व्यक्त व्हावचं लागेल. असं म्हणून अमोल कोल्हे यांनी कविताच सादर केली. या कवितेत ते म्हणतात.
जागलेली माणसं, वाचलेली पुस्तकं
रुजलेले विचार सारे कुतूहलाने गोळा झाले
हे नवीन पुतळे, ते नवीन बॅनर
एवढ्या अचानक कुठून आले?
पुतळ्यांच्या गळ्यात चपलांचे हार
प्रत्येक बॅनरला जोड्यांचा प्रसाद
रुजल्या विचारांनी आस्थेनं विचारलं
काय झालं?
पुन्हा कोणी समाज सुधारण्यासाठी
काम सुरू केलं?
प्रश्नासरशी
बॅनर्सने लाजेने अंग गुंडाळून घेतलं
पुतळ्यांनी तर शरमेनं तोंड लपवली
तरीही एका जागल्या माणसानं
त्यांची ओळख पटवली.
बॅनरवरील चेहरा पाहिला होता
भला मोठा हार घालताना
आवाजसुद्धा ऐकला होता
जोषपूर्ण भाषण ठोकताना..
अरेच्चा! हे तर तेच महोदय….
हे तर ते , ते तर हे म्हणता म्हणता
सगळ्या चेहऱ्यांची ओळख पटली..
निषेध उद्वेग संताप
सारं काही उमटलं होतं
प्रत्यक्षात जमत नाही म्हणून
बॅनर पुतळ्यांना कुटलं होतं
कळवळून शेवटी एक पुतळा बोलला
जोडे खाऊन खाऊन आम्हालाच कंटाळा आला…
डोक्यात शेण भरलंय त्यांच्या
अन् भोग मात्र आमच्या वाट्याला..
महापुरुषांच्या नखाचीही सर नसताना
का जावं अकलेचे तारे तोडायला
समाधानाने पुस्तकं फडफडली
चला, आमच्या शब्दांमध्ये अजून जान आहे
राज्यकर्त्यांचे भान सुटलं
तरी जनतेला मात्र जाण आहे.