पुणे : बलात्कार आणि विनयभंगप्रकरणी (Rape and molestation) माजी आयएएस अधिकाऱ्याला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने शनिवारी ही शिक्षा सुनावली आहे. माजी भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी मारुती हरी सावंत यास मार्च 2015मध्ये 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि अन्य तीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याचबरोबर 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. ही घटना मार्च 2015मध्ये घडली होती. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता (IPC)च्या कलम 376, 354, 506 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम 4, 6, 8, 10 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. सावंत 1998च्या बॅचचा पदोन्नत झालेला IAS अधिकारी होता. या घटनेनंतर सरकारने मारुती हरी सावंत याला सेवेतून निलंबित केले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत हा शिवाजीनगर येथील एका फ्लॅटमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता आणि हिंगणे खुर्द येथील शाळेजवळील त्यांच्या सासरच्या अपार्टमेंटमध्ये वारंवार येत होता. याचठिकाणी हा प्रकार झाल्याची माहिती आहे. अनेक शाळकरी विद्यार्थिनी खेळाच्या मैदानावर खेळायला आल्या होत्या. तेथे सावंत त्यांना बिस्किटे आणि चॉकलेटचे आमिष दाखवत असे. त्यानंतर तो त्यांना त्याच्या सासरच्या फ्लॅटवर घेऊन जायचा. त्याच्या संगणकावर अश्लील चित्रफिती बघायला लावायचा आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. मुलींनी त्यांच्या शाळेतील समुपदेशकांना याबद्दल माहिती दिली. समुपदेशक आणि पालकांनी याचे गांभीर्य ओळखत पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या कॉम्प्युटरमधून जवळपास 3 हजार 500 अश्लील व्हिडिओ क्लिप्स जप्त केल्या होत्या. त्यानंतर त्याला कोर्टात सादर करण्यात आले होते. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रताप परदेशी यांनी युक्तिवाद केला. आता या माजी आयएएस अधिकाऱ्याला सत्र न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सावंत 1998च्या बॅचचा पदोन्नत झालेला IAS अधिकारी होता आणि त्याची महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद (MCAER) पुणे येथे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर सरकारने मारुती हरी सावंत याला निलंबित केले.